शरद पवार, अजितदादांना भेटणारे महेश कोठे उद्धव ठाकरेंच्याही स्वागताला 

या वेळी ठाकरे यांनी 'मला तुझ्याशी खूप काही बोलायचे आहे, तू वेळ घेऊन मुंबईला भेटायला ये,' अशी सूचना कोठे यांना केली आहे.
Mahesh Kothe who met Sharad Pawar and Ajit Pawar also welcomed Uddhav Thackeray
Mahesh Kothe who met Sharad Pawar and Ajit Pawar also welcomed Uddhav Thackeray

सोलापूर : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार ते पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांना भेटणारे सोलापूरचे माजी महापौर आणि विरोधी पक्षनेते महेश कोठे हे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी शिवसेनेच्या इतर नेत्यांबरोबर विमानतळावर हजर होते.

गेल्या काही दिवसांपासून कोठे यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांशी गाठीभेटी सुरू होत्या. विकास निधीसाठी आम्ही भेटत असल्याचे कोठे यांचे म्हणणे असले तरी त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा जोरात होती. 

सोलापूर महापालिकेत भाजपची सत्ता आहे. राज्यात शिवसेना, कॉंग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. अशा स्थितीत महापालिकेतील शिवसेना नगरसेवकांना महापालिका तसेच राज्य सरकारकडून मिळत नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे शिवसेनेचे नेते असलेले कोठे हे काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटी घेत होते. नगरसेवकांना निधी मिळावा, यासाठी त्यांनी पालकमंत्री भरणे यांची भेट घेतली होती. तत्पूर्वी ते ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही भेटले होते. 

या भेटींमुळे शिवसेनेत अस्वस्थ असलेले कोठे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मार्गावर असल्याची चर्चा शहरात सुरू होती. मात्र, कोठे यांच्याकडून त्याचा इन्कार करण्यात येत होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहर दक्षिण मध्य मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्याने ते शिवसेनेवर काहीसे नाराज होते. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत चर्चा रंगायची. 

राष्ट्रवादीकडून मात्र कोठे यांच्याबाबत सबुरीचे धोरण स्वीकारण्यात आले होते. कारण, पारनेरच्या नगरसेवकांना पक्षात प्रवेश देऊन त्यांना परत करावे लागल्याने अजित पवार हे ताकही फुंकून पिण्याच्या बेतात होते. पारनेरच्या तो पक्षांतराचा मुद्दा शिवसेनेने प्रतिष्ठेचा केला होता. त्यामुळेच कोठे यांच्याबाबत राष्ट्रवादीकडून तातडीने निर्णय होत नव्हता. दरम्यान, सोलापूरच्या दौऱ्यावर आलेल्या अजित पवारांनी मित्रपक्षाचे नेते न फोडण्याचे संकेत दिले होते. 

या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे हे आज तुळजापूरमधील नुकसानाचा आढावा घेण्यासाठी आले होते. सोलापूर विमानतळावर उतरून ते मोटारीने पुढे गेले. त्या वेळी स्वागतासाठी कोठे विमानतळावर आवर्जून उपस्थित होते. या वेळी ठाकरे यांनी "मला तुझ्याशी खूप काही बोलायचे आहे, तू वेळ घेऊन मुंबईला भेटायला ये,' अशी सूचना केली आहे, असे कोठे यांनी सांगितले.  

सोलापुरातील शिवसेना नगरसेवकांना राज्य सरकारकडून दहा कोटी रुपयांचा निधी द्यावा अशी मागणी कोठे यांनी आज ठाकरे यांच्याकडे केली आहे. मार्चनंतर सोलापुरातील शिवसेना नगरसेवकांसाठी आणखी 25 कोटी रुपयांची मागणी करणार असल्याची माहिती कोठे यांनी दिली. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com