एकनाथ खडसेंच्या संभाव्य पक्षांतराचा भाजपला पहिला फटका या शहरात - Khadse's possible defection may affect BJP in Jalgaon corporation | Politics Marathi News - Sarkarnama

एकनाथ खडसेंच्या संभाव्य पक्षांतराचा भाजपला पहिला फटका या शहरात

कैलास शिंदे
शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020

खडसेंच्या मागे जळगावातील किती नगरसेवक जाणार, याची उत्सुकता 

जळगाव : भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असतानाच भाजप अंतर्गत  संघर्ष जोरात सुरू झाला आहे. याचे पडसाद जळगाव महापालिकेत उमटले असून स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडीवरून वादाची ठिणगी पेटली आहे.

जळगाव महापालिकेत भाजपचे बहुमत आहे. त्यामुळे स्थायी समितीतही भाजपचे वर्चस्व आहे. अध्यक्षपदाची निवडणूक येत्या २२ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या साठी पक्षातर्फे राजेंद्र घुगे पाटील यांचे नाव सुचविण्यात आले आहे आहे. मात्र आता त्याला पक्षातून विरोध होत आहे. पक्षातर्फे माजी महापौर ललित कोल्हे, नगरसेवक नवनाथ  दारकुंडे यांनीही दावा केला आहे. त्यांनी पक्षाने आम्हला संधी द्यावी, असा थेट दावा करीत आव्हान उभे केले आहे. त्यामुळे पक्ष नेतृत्वा समोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

भाजपचे नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी आज अर्जही घेतला. त्यांच्या समवेत एमआयएमचे गटनेते होते.त्यामळे महापालिकेत होणारी फूट टाळण्याचे भाजप नेतांसमोर आव्हान आहे.   महापालिकेत भाजपचे नेतृत्त्व माजी मंत्री गिरीश महाजन व आमदार सुरेश भोळे यांच्याकडे आहे. खडसे यांना मानणारेही येथे नगरसेवक आहेत.

खडसे यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश निश्चित मानला जात आहे. त्यासाठी घटस्थापनेचा मुहूर्त देण्यात आला होता. प्रत्यक्षात अजून तशा हालचाली दिसत नाहीत. राष्ट्रवादीकडून यावर कोणी अधिकृतरित्या बोलत नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत आपल्याला काही माहिती नसल्याचे आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. खासदार सुप्रिया सुळे यांनीही खडसेंच्या प्रवेशाबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेच माहिती देतील, असे सांगितले. दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपला खडसेंवर विश्वास असून ते भाजप सोडणार नसल्याचा दावा केला. अशी सारी वक्तव्ये होत असल्याने खडसेंचा प्रवेश नक्की कधी होणार, याची चर्चा अद्याप थांबलेली नाही. 

खडसे यांचे समर्थक माजी आमदार उदेसिंह पाडावी यांनी आपल्याला राष्ट्रवादीत जाण्याचा सल्ला खडसेंनीच दिला होता आणि माझ्यापाठोपाठ ते पण राष्ट्रवादीतच येणार, असे त्यांनी आपल्याला सांगितले असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र खडसे हे सध्या या विषयावर मौन बाळगून आहेत. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख