शरद पवारांकडून पंढरपूरच्या पाटील घराण्याच्या निष्ठेला न्याय; गणेश पाटलांकडे राष्ट्रवादी युवकची जबाबदारी  - Justice by Sharad Pawar for the loyalty of the Patil family of Pandharpur; Ganesh Patil has the responsibility of NCP youth | Politics Marathi News - Sarkarnama

शरद पवारांकडून पंढरपूरच्या पाटील घराण्याच्या निष्ठेला न्याय; गणेश पाटलांकडे राष्ट्रवादी युवकची जबाबदारी 

भारत नागणे 
शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020

यशवंतभाऊ आणि राजूबापू पाटील यांची गेल्या दोन पिढ्यांपासूनची निष्ठा आमच्या कायम लक्षात राहील, असे शरद पवारांनी सांगितले होते.

पंढरपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेपासून पक्षाशी एकनिष्ठ असणारे आणि पक्षाच्या पडत्या काळात ज्येष्ठ नेते शरद पवारांवर कायम निष्ठा ठेवणाऱ्या पंढरपूरच्या (स्व.) राजूबापू पाटील यांच्या घराण्यास पक्षानेही कायम न्याय देण्याची भूमिका घेतली.

नुकत्याच झालेल्या सांत्वनपर दौऱ्यात पवारांनी यशवंतभाऊ आणि राजूबापू पाटील यांची गेल्या दोन पिढ्यांपासूनची निष्ठा आमच्या कायम लक्षात राहील, असे सांगितले होते. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी राजूबापू यांचे चिरंजीव आणि भोसे (ता. पंढरपूर) गावचे उपसरपंच ऍड. गणेश पाटील यांच्यावर सोपवून पाटील घराण्याकडे आपले लक्ष असल्याचे पवारांनी दाखवून दिले आहे. 

पक्षाचे प्रदेशध्यक्ष जयंत पाटील यांनी आज (ता. 23 ऑक्‍टोबर) ऍड गणेश पाटील यांना मुंबईत निवडीचे पत्र दिले. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पवारांशी एकनिष्ठेने काम केलेले आजोबा (कै.) यशवंतभाऊ आणि वडील (कै.) राजूबापू पाटील यांच्या निष्ठेचे फळ म्हणून गणेश पाटील यांच्यावर पक्ष संघटनेची जबाबदारी देण्यात आली आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील यांचे अलीकडेच कोरोनामुळे निधन झाले. त्यानंतर खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाटील कुटुंबीयांची भेट घेवून धीर दिला होता. त्याच वेळी पवारांनी पाटील यांना राजकीय ताकद देवून सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन दिले होते. त्यानंतर पाटील कुटुंबाकडे जिल्हास्तरीय पद देऊन त्यांना जिल्ह्याच्या राजकारणात सक्रीय केले आहे. 

यशवंतभाऊ पाटील यांनी आपले संपूर्ण राजकीय आयुष्य शरद पवारांसोबत घालवले. त्यानंतर त्यांचे पुत्रे राजूबापू पाटील यांनीही पवारांवरील आपली निष्ठा कायम ठेवली होती. पक्ष अडचणीत असताना राज्यभरातील अनेक नेते पक्षाला सोडून जात असताना राजूबापूंनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला खंबीरपणे साथ दिली होती. 

विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातून राजूबापूंना संधी मिळत असतानाही त्यांनी पक्षासाठी माघारी घेत बबनदादा शिंदे यांच्या नावाची शिफरस केली होती. यशवंतभाऊ आणि राजूबापू पाटील यांनी पक्षासाठी केलेल्या त्यागाचे फळ म्हणूच त्यांच्या तिसऱ्या पिढीतील गणेश पाटील यांना पक्षाने संधी देवून पाटील यांना निष्ठेचे फळ दिले आहे. 

गणेश पाटील हे विधिज्ञ असून ते मागील पाच वर्षांपासून भोसे गावचे उपसरपंच म्हणून काम पाहत आहेत. शिवाय ते एका खासगी साखर कारखान्याची धुरादेखील सांभाळत आहेत. पंढरपूर तालुक्‍याच्या राजकरणात पाटील कुटुंबाचा आजही दबदबा कायम आहे, त्यामुळे पाटील यांच्या निवडीला महत्व आहे. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख