देशमुखांनी भाजपसाठी जे केले; ते भरणे राष्ट्रवादीसाठी करून दाखवतील काय? - How will Dattatreya Bharane in the upcoming elections bring success to the NCP?-vd83 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीकडे रवाना, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

देशमुखांनी भाजपसाठी जे केले; ते भरणे राष्ट्रवादीसाठी करून दाखवतील काय?

प्रमोद बोडके
बुधवार, 21 जुलै 2021

त्यामुळेच आजही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे आमदार देशमुखांच्या शब्दाला खास वजन आहे.

सोलापूर : पालकमंत्री म्हणून बेरजेचे राजकारण करत आपल्या पक्षाला यशाच्या शिखरावर नेण्यात भाजप सरकारमधील सोलापूरचे तत्कालिन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यशस्वी झाले होते. त्यामुळेच आजही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे आमदार देशमुखांच्या शब्दाला खास वजन आहे. पालकमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडण्यात देशमुख यशस्वी झाले. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सोलापूरच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी असलेले दत्तात्रेय भरणे आगामी निवडणुकी राष्ट्रवादीला कसे यश मिळवून देतात? याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. (How will Dattatreya Bharane in the upcoming elections bring success to the NCP?)

कॉंग्रेस असो की राष्ट्रवादी, शिवसेना असो की अन्य कोणी अलीकडच्या काळात सोलापूर महापालिकेवर एकहाती सत्ता मिळविण्यात कोणत्याही पक्षाला यश आले नाही. पण, 2017 च्या निवडणुकीत भाजप बहुमताच्या जवळ पोचला होता. यामध्ये आमदार विजयकुमार देशमुखांचा सिंहाचा वाटा ठरला. त्यांच्या शहर उत्तर विधानसभा मतदार संघातील ३४ पैकी २२ जागांवर भाजपचे नगरसेवक विजयी झाले आहेत. महापलिकेत निवडून आलेल्या ४९ नगरसेवकांपैकी ४० नगरसेवक देशमुख गटाचे आहेत. 

हेही वाचा : शिवसेनेचा सहकारातील बडा नेता भाजपत जाणार?....जिल्हाप्रमुखाने काढले पत्रक 

जिल्हा परिषदेवर भाजप किंवा भाजप पुरस्कृत आघाडीचा कधीच अध्यक्ष होत नव्हता. सुरुवातीला संजय शिंदे आणि दुसऱ्यांदा अनिरुध्द कांबळे यांच्या माध्यमातून भाजप व मित्र पक्षाचा अध्यक्ष करण्यात आमदार देशमुखांचा मोठा वाटा आहे.

प्रशांत परिचारक यांच्या माध्यमातून विधानपरिषदेची स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा जिंकण्यातही भाजपला यश मिळाले. लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीत सोलापूरसोबतच माढ्याची जागा जिंकण्याचा विषय असो की अक्कलकोट, शहर उत्तर आणि दक्षिण सोलापूर तालुक्‍याच्या बाहेर भाजपचा विस्तार करण्यात आमदार विजयकुमार देशमुखांनी मोलाची भूमिका पार पाडली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हातात एकेकाळी असलेली सर्व सत्तास्थाने भाजपने आपल्या ताब्यात घेतली आहेत. विधान परिषद, नगरपरिषदा, जिल्हा परिषद व महापालिका या सर्व निवडणुका येत्या काळात होणार आहेत. सोलापूरचे पालकमंत्री म्हणून या निवडणुकीत भरणे यांचा कस लागणार आहे.

गटबाजीत अडकलेली ग्रामीण राष्ट्रवादी, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, बार्शी, सांगोला, मंगळवेढा या तालुक्‍यात राष्ट्रवादीकडे नसलेला आश्‍वासक स्थानिक चेहरा या आव्हानांचा पालकमंत्री भरणे यांना सामना करावा लागणार आहे. पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत पालकमंत्री भरणे यांनी प्रयत्न केले; परंतु या निवडणुकीत राष्ट्रवादीला काठावरचे अपयश आले. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची विधान परिषद निवडणूक होणार आहे.

या निवडणुकीत उमेदवार निवडीपासून निवडलेला उमेदवार विजयी करेपर्यंत पालकमंत्री भरणे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला अनेक अडथळ्यांवर मात करावी लागणार आहे.

शहरात राष्ट्रवादी आशावादी

राष्ट्रवादीने आतापर्यंत सोलापूर शहरावर फारसे लक्ष दिले नव्हते. आता मात्र शिवसेना नगरसेवक महेश कोठे, एमआयएमचे नगरसेवक तौफिक शेख यांच्यासह एमआयएमच्या पाच ते सहा नगरसेवकांच्या माध्यमातून राष्ट्रवादीने सोलापूरवर विशेष लक्ष दिले आहे. महापालिकेच्या आगामी निवडणुकीत सोलापूर शहरात राष्ट्रवादीला चांगली साथ मिळेल, अशी अपेक्षा आहे. सोलापूर शहराच्या बाबतीत राष्ट्रवादी पहिल्यांदाच आशावादी झाली आहे. महापालिकेत मिळालेली सत्ता कायम ठेवण्यासाठी आणि सोलापुरात सत्ता मिळविण्यासाठी आगामी काळात माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख व सध्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा राजकीय कस लागणार आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख