गेल्या सहा महिन्यांपासून कर्ज काढून राज्य चालवतोय : अजित पवार  - He has been running the state for the last six months by taking out loans: Ajit Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

गेल्या सहा महिन्यांपासून कर्ज काढून राज्य चालवतोय : अजित पवार 

भारत नागणे 
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

राज्यापुढे अनेक आर्थिक अडचणी असून केंद्र सरकारने जीएसटीचे 60 हजार कोटी रुपये तातडीने द्यावेत.

पंढरपूर : कोरोनाचे संकट असतानाच पुन्हा राज्यावर पुराचे आणि अतिवृष्टीचे अस्मानी संकट ओढवले आहे. यामुळे राज्य सरकारचीदेखील आर्थिक कोंडी झाली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून कर्ज काढून राज्याचा कारभार चालवला जातोय, असे सांगत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पंचनामे केल्यानंतर, तसेच केंद्राकडून निधी मिळाल्यानंतर अर्थिक मदत जाहीर करण्यात येईल, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. 

अतिवृष्टी आणि महापुरामुळे पंढरपूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे पंढरपूर शहरातील कुंभार घाटाजवळ सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्याची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आज (ता. 17 ऑक्‍टोबर) पंढरपुरात आले होते. पाहणीनंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

राज्यापुढे अनेक आर्थिक अडचणी असून केंद्र सरकारने जीएसटीचे 60 हजार कोटी रुपये तातडीने द्यावेत, अशी मागणीही पवार यांनी या वेळी केली. 

आमदार भारत भालके, प्रांताधिकारी सचिन ढोले, जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत कदम, राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हा अध्यक्ष मारुती जाधव, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष संदीप मांडवे, श्रीकांत शिंदे आदी या वेळी उपस्थित होते. 

पंढरपुरात येण्यापूर्वी पवार यांनी तालुक्‍यातील पटवर्धन कुरोली, भोसे आदी ठिकणच्या नुकसान झालेल्या पिकांची आणि रस्त्यांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. 

पवार म्हणाले की, परतीच्या पावसामुळे राज्यात मोठे नुकसान झाले आहे. सोमवारी मुंबईत राज्यातील नुकसानीची आढावा बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतर केंद्र सरकारकडे निधीची मागणी केली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला भरीव मदत करावी. राज्याचे जीसटीचे तब्बल 60 हजार कोटी रुपये केंद्राकडून येणे आहेत. ते तातडीने द्यावेत. 

कोरोना महामारीच्या काळात देशाचे पंतप्रधाना "व्हीसी'द्वारे देशाचा आढावा घेत आहेत. मग, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला तर बिघडले कुठे? असा सवाल उपस्थित करत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पाठराखण केली. 

जलयुक्त शिवार योजनेच्या कामाबाबत कॅगने ताशेरे ओढले आहेत. कॅग ही केंद्र सरकारची एजन्सी आहे. या कामाची चौकशी करण्यामागे कोणताही राजकीय आकस नाही.

पंढरपुरात जवळपास एक हजार कोटींची विकासकामे झाली आहेत. मात्र, ती अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली आहेत. सध्या सुरु असलेल्या घाटाचे काम देखील निकृष्ठ दर्जाचे झाले आहे. याबाबत पुणे येथे दोन तीन दिवसांत आढावा बैठक घेवून माहिती घेणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले . 

परिचारक कुटुंबीयांची घेतली भेट 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (ता. 17 ऑक्‍टोबर) माजी आमदार सुधाकर परिचारक यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. या वेळी त्यांनी (कै.) सुधाकर परिचारक यांच्या सहकार क्षेत्रातील अनेक आठवणी सांगितल्या. या वेळी आमदार प्रशांत परिचारक, उमेश परिचारक यांच्याशीही त्यांनी संवाद साधला. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख