त्यांची समजूत काढत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आषाढीची महापूजा निर्विघ्न पार पाडू   - Guardian Minister Dattatreya Bharane reviewed the planning of Ashadi Wari | Politics Marathi News - Sarkarnama

त्यांची समजूत काढत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आषाढीची महापूजा निर्विघ्न पार पाडू  

भारत नागणे
शुक्रवार, 9 जुलै 2021

पालकमंत्री भरणे यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनीच मुख्यमंत्र्यांना हा थेट इशारा दिल्याने खळबळ उडाली होती.

पंढरपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घालून दिलेले नियम आणि वारकरी परंपरांचा मेळ साधून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आषाढी वारीचे योग्य नियोजन करावे, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणारी आषाढी एकादशीची विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजादेखील निर्विघ्नपणे पार पडेल, असा विश्वास वन राज्यमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी पंढरपुरात बोलताना व्यक्त केला. (Guardian Minister Dattatreya Bharane reviewed the planning of Ashadi Wari)

पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी आज आषाढी वारीच्या नियोजनाबाबत संबंधित विभाग प्रमुखांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या महापूजेबाबत सूचक वक्तव्य केले. धनगर समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी राज्य धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्यांची अलीकडेच पंढरपुरात एक बैठक झाली होती. या बैठकीमध्ये थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना इशारा दिला होता. मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवूनच पंढरपूरला आषाढीच्या महापूजेसाठी यावे; अन्यथा  मुख्यमंत्र्यांना महापूजेसाठी पंढरपुरात येवू देणार नाही, असा इशारा दिला होता. पालकमंत्री भरणे यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनीच मुख्यमंत्र्यांना हा थेट इशारा दिल्याने खळबळ उडाली होती.

हेही वाचा :  राज्यातील झेडपी, पंचायत समितीच्या पोटनिवडणुका स्थगित

येत्या 20 जुलै रोजी आषाढीचा सोहळा साजरा होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहपत्नीक विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा होणार आहे. या पार्श्वभूमीवर महापूजा आणि वारीचे नियोजन करण्यासाठी पालकमंत्री भरणे यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची एक बैठकही पार पडली. यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या महापूजेसंबंधी चर्चा झाली.

बैठकीनंतर धनगर समाजाने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या इशाराकडे लक्ष वेधले असता, पालकमंत्री भरणे यांनी धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांची समजूत काढून त्यांचे समाधान केले जाईल.‌ महापूजेसाठी सर्वांचे सहकार्य घेणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणारी आषाढीची शासकीय महापूजा ही निर्विघ्नपणे पार पडेल, असा विश्वासही व्यक्त केला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभाग, नगरपालिका प्रशासन आणि जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांनी ही समन्वय ठेवून लसीकरण, स्वच्छता, आरोग्य तपासणी, शुध्द पाण्याचा पुरवठा, आवश्यक ठिकाणी तात्पुरती स्वच्छतागृहे, वाखरी पालखीतळ स्वच्छता याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अशा सूचनाही मंत्री भरणे यांनी दिल्या.

बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, आमदार प्रशांत परिचारक, समाधान आवताडे, नगराध्यक्षा साधना भोसले, विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके, पंढरपूर मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त मुख्याधिकारी कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, प्रांताधिकारी सचिन ढोले, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, मंदिर समितीचे मुख्याधिकारी विठ्ठल जोशी, तहसीलदार सुशील बेल्हेकर आदी उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख