मला त्रास दिल्याशिवाय आढळरावांना बरेच वाटत नाही  : मोहिते - Former MP Adhalrao Patil does not feel well without harassing me : Dilip Mohite | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.
महाड तालुक्यातील तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली | दरडीत घरांचे मोठे नुकसान | 72 लोक बेपत्ता झाल्याचा अंदाज| पोलिसांचे पथक घटना स्थळाकडे रवाना

मला त्रास दिल्याशिवाय आढळरावांना बरेच वाटत नाही  : मोहिते

  रुपेश बुट्टे पाटील
सोमवार, 19 जुलै 2021

यांनी तीन वेळा जनतेला फसविले.

आंबेठाण (जि. पुणे) : आंबेगाव तालुक्यात विकासकामे होत असताना, तिथे विरोध करायचा नाही. पण, खेड तालुक्यात काही विकासकामे व्हायला लागली की आडकाठी घालायची. मला त्रास दिल्याशिवाय शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना बरे वाटत नाही, असा टोला आमदार दिलीप मोहिते यांनी लगावला. (Former MP Adhalrao Patil does not feel well without harassing me : Dilip Mohite)

खेड तालुक्यातील शिंदे गाव येथे विविध विकास कामाचे उदघाटन कार्यक्रमाप्रसंगी आमदार दिलीप मोहिते बोलत होते. त्यावेळी त्यांनी शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव यांचा समाचार घेतला. 

हेही वाचा : कोल्हेंचा आढळरावांना टोला; त्यांना उत्तर द्यायची मला गरज वाटत नाही!

मोहिते म्हणाले की, खेड तालुक्यात एमआयडीसी, विमानतळ, एसईझेड, पंचायत समिती इमारत अशी विकास कामे व्हायला लागली की हे इकडे येऊन विरोध करतात. असाच विरोध आंबेगाव तालुक्यातील विकासकामांना करतात का, असा सवाल उपस्थित करीत यांनी तीन वेळा जनतेला फसविले. शेवटी लोकांनी यांना घरी बसविले. वय झाले तरी ते थांबणार नाहीत असा टोला लगावत आता त्यांनी तरुणांना संधी द्यावी. मला जनतेने संधी दिली त्यातून विकासकामे केली म्हणून जनता माझ्यावर प्रेम करते.

उपसभापती शिवेकरांचे पानमंदांना तयारीला लागण्याचे आवाहन

पंचायत समितीच्या मागील पंचवार्षिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले उपसभापती चांगदेव शिवेकर यांच्या विरोधात पराभूत झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल पानमंद यांना उपसभापती शिवेकर यांनी ‘तुम्ही तयारीला लागा; आम्ही तुमच्या बरोबर आहोत,’ असे सांगताच उपस्थितानी टाळ्या वाजवत शिवेकर यांच्या भूमिकेचे स्वागत केले. खेड तालुक्यात दिलीप मोहिते यांच्या माध्यमातून मोठा विकास सुरू असल्याचेही उपसभापती शिवेकर यांनी सांगितले.

या वेळी पंचायत समिती उपसभापती चांगदेव शिवेकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास लिंभोरे, रोहिदास गडदे, रमेश राळे, सरपंच सचिन देवकर, उपसरपंच सायली टेमगिरे, राष्ट्रवादीचे अमोल पानमंद, भाजपचे उपाध्यक्ष सुनील देवकर, संतोष गव्हाणे, विजय घनवट, भरत लांडगे, अक्षय पडवळ, दिनेश लांडगे, किरण पडवळ, रवींद्र गाढवे, ग्रामसेवक अतुल रावते, पोलिस पाटील गुलाब मिंडे आदी उपस्थित होते.

प्रास्ताविकात सरपंच सचिन देवकर यांनी साकव पुलासाठी निधी मिळाल्याबद्दल आमदार मोहिते यांचे आभार मानले. वासुली फाटा ते शिंदे गाव रस्ता दुरुस्तीची मागणी सरपंचांकडून करण्यात आली. सुनील देवकर यांनी सूत्रसंचालन केले. विजय घनवट यांनी आभार मानले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख