अजित पवारांच्या दौऱ्याची पालकमंत्र्यांअगोदर संजय शिंदेंना खबर !  - The first news of Ajit Pawar's visit to Solapur to MLA Sanjay Shinde | Politics Marathi News - Sarkarnama

अजित पवारांच्या दौऱ्याची पालकमंत्र्यांअगोदर संजय शिंदेंना खबर ! 

प्रमोद बोडके 
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

विशेष म्हणजे या दौऱ्याची सुरुवातही आमदार शिंदे यांच्या नगोर्ली (ता. माढा) येथील फार्महाऊस येथून झाली.

सोलापूर : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (ता. 17 ऑक्‍टोबर) सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला.

जिल्ह्यात पाहणी करणाऱ्या पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनाही त्याची खबरबात नव्हती. मात्र, करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे यांना "मी तुझ्याकडे येतोय,' असे निरोप खुद्द अजितदादांनीच दिल्याचे आता पुढे येत आहे. विशेष म्हणजे या दौऱ्याची सुरुवातही आमदार शिंदे यांच्या नगोर्ली (ता. माढा) येथील फार्महाऊस येथून झाली आणि दौऱ्याच्या शेवटपर्यंत शिंदे हे उपमुख्यमंत्र्यांबरोबर होते. 

दरम्यान, माढा आणि पंढरपूरचा दौरा केल्यानंतर आपल्या पदरात काय पडते, यासाठी अजित पवारांच्या सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेकडे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे डोळे लागले होते. मात्र, तत्पूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सोलापूर दौरा जाहीर झाला आणि केवळ नुकसानीची माहिती देऊन पवारांनी पत्रकार परिषद आटोपती घेतली. 

ज्येष्ठ नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दौरा जाहीर केल्यानंतर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्यक्ष पाहणी सुरू केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सायंकाळी सोलापूर जिल्ह्यात पाहणी दौरा घोषित केला. तत्पूर्वी भाजप आणि मनसेच्या नेत्यांनीही उद्धव ठाकरे यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे आश्रू पुसावेत आणि त्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी केली होती. 

मुख्यमंत्री ठाकरे उद्या (ता. 19 ऑक्‍टोबर) महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या अक्कलकोट तालुक्‍यातील नुकसानीची आढावा घेणार आहेत. खरं तर अक्कलकोट मतदारसंघात कॉंग्रेस व भाजपचे वर्चस्व आहे. त्या ठिकाणी शिवसेनेची ताकद फारशी नाही, तरीही त्यांनी अक्कलकोटची निवड का करावी, असा प्रश्‍न विचारला जात आहे. 

तत्पूर्वी अजित पवार यांनी माढा आणि पंढरपूर तालुक्‍यातील नुकसानाची शनिवारी आढावा घेतला. पालकमंत्री या नात्याने भरणे यांना उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची माहिती असायला हवी. भरणे हे त्या वेळी मोहोळ, अक्कलकोट तालुक्‍यातील नुकसानीची पाहणी करत होते. पण, त्यांच्याअगोदर आमदार संजय शिंदे यांना या दौऱ्याची खबर होती.

अजितदादांनीच शिंदे यांना "मी तुझ्याकडे येतोय' असा निरोप दिल्याची माहिती आता समोर येत आहे. पवारांनी माढ्यातून पाहणी सुरू केली. त्यानंतर ते पंढरपूर तालुक्‍यात पोचले. अगदी शेवटपर्यंत संजय शिंदे हे अजितदादांबरोबर होते. 

विशेष म्हणजे प्रशासनातील मोजके अधिकारी वगळता इतर कोणालाही उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात माहिती देण्यात आली नव्हती. माढा, पंढरपूर तालुक्‍यातील नुकसानीचा त्यांनी आढावा घेतला. पंढरपुरात पाटील, परिचारक यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेटही त्यांनी घेतली. त्यानंतर सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात सायंकाळी सात वाजता पत्रकार परिषद ठेवली होती. 

मदतीचा विषय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात 

झटपट निर्णय घेणारे म्हणून ख्याती असलेले अजित पवार आज मदतीची कोणती घोषण करतात, याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. मात्र, तत्पूर्वीच मुख्यमंत्र्यांचा दौरा जाहीर झाला. मुख्यमंत्री सोलापूरच्या दौऱ्यावर येत असताना उपमुख्यमंत्र्यांनी मदतीच्या पॅकेजची घोषणा करणे योग्य होणार नाही, असे सांगून अजितदादांनी नुकसानीची माहिती देत पत्रकार परिषद आटोपती घेतली. नुकसानग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीचा विषय त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या कोर्टात ढकला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आता मुख्यमंत्री ठाकरे यांच्या दौऱ्याकडे लक्ष लागले आहे. 
Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख