सरकार पडण्याच्या भीतीनेच साखर कारखानदारांना थकहमी : प्रवीण दरेकरांचा गंभीर आरोप 

थकहमी दिलेल्या कारखान्यांपैकी बहुतांश साखर कारखाने हे महाविकास आघाडीतील आमदारांशी संबंधित आहेत.
Financial aid to sugar mills for fear of government collapse: Praveen Darekar's serious allegation
Financial aid to sugar mills for fear of government collapse: Praveen Darekar's serious allegation

सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपूरमध्ये अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी करताना गेल्या सहा महिन्यांपासून कर्ज काढून राज्य चालवतोय, असे म्हटले होते. त्यावर टीका करताना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकावर गंभीर आरोप केला आहे. 

"कर्ज काढून मागील सहा महिन्यांपासून राज्याचा कारभार पाहणाऱ्या सरकारने 32 साखर कारखान्यांना थकहमी का दिली, असा प्रश्न दरेकर यांनी उपस्थित करत "सरकार कोसळण्याच्या भीतीनेच कारखानदारांना थकहमी दिली,' असा आरोप केला आहे. 

प्रवीण दरेकर यांनी अक्कलकोट तालुक्‍यातील नुकसानीची पाहणी केल्यानंतर सोलापुरात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दरेकर यांनी वरील आरोप केला. 

ते म्हणाले की, राज्य सरकारने अडचणीतील 32 कारखान्यांना 516 कोटींची थकहमी देत कारखाने सुरू होण्यासाठी मदतीचा हात दिला आहे. परंतु थकहमी दिलेल्या कारखान्यांपैकी बहुतांश साखर कारखाने हे महाविकास आघाडीतील आमदारांशी संबंधित आहेत. शेतकरी कर्जमाफीसह कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या गोरगरिबांचे प्रश्न मोठ्या प्रमाणावर असतानाही राज्य सरकारने कारखानदारांना थकहमी देऊन टाकली आहे. त्यामागचे कारण कारखानदारांची नाराजी आणि सरकार कोसळण्याची भीती हेच होते. 

राज्यातील शेतकरी अतिवृष्टीच्या दणक्‍याने पुरता उदध्वस्त झाला आहे. अशा वेळी त्याला तातडीने मदत करण्याची आवश्‍यकता होती. परंतु काल सोलापूर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बळिराजांची पुरता निराशा केली आहे. खरे तर त्यांनी ठोस मदत करण्याची आवश्‍यकता होती. मात्र, घोषणा न करताच केवळ आश्‍वासनावर त्यांनी शेतकऱ्यांची बोळवण केली आहे. या अस्मानी संकटाने बळिराजाच्या डोळ्यात पाणी आणले आहे, त्याला तातडीने आर्थिक मदत देऊन त्याच्या डोळ्यातील आश्रू पुसायला हवे होते. मात्र, येथेही सरकार रडत बसले, असा आरोप दरेकर यांनी केला. 

अगोदर प्रस्ताव तरी पाठवा... 

राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत न देता केंद्र सरकारकडे बोट दाखवून जबाबदारीपासून पळ काढला आहे. केंद्र सरकारकडे मदतीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अद्याप प्रस्ताव पाठवलेला नाही. कारण, नेमके नुकसान किती झाले, याचा अंदाज सरकारला आलेला नाही. केंद्र सरकारला अगोदर प्रस्ताव पाठवा आणि मगच मदत मिळेल. तत्पूर्वी, राज्य सरकारने स्वतः मदत द्यावी, अशी मागणी दरेकर यांनी केली.  

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com