वडिलांनंतर दोन मुलांनीही पटकावला ‘स्थायी’चे सभापती बनण्याचा बहुमान!

एकाच कुटुंबात तीनवेळा सभापतिपद येण्याचा विक्रमहा आवटी कुटुंबाच्या नावे नोंद झाला आहे.
वडिलांनंतर दोन मुलांनीही पटकावला ‘स्थायी’चे सभापती बनण्याचा बहुमान!
father and two children also became the chairpersons of standing committee

सांगली :  सांगली महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदी अपेक्षेनुसार भाजपचे निरंजन आवटी यांचीच निवड झाली. त्यांनी कॉंग्रेसचे फिरोज पठाण यांचा ९-७ असा पराभव केला. या निवडीमुळे सभापतिपदाची मिरजेने हॅट्‌ट्रीक साधली आहे. यामुळे आवटी कुटुंबांत हे पद तिसऱ्यांदा आले आहे. यापूर्वी निरंजन यांचे वडील सुरेश आवटी आणि त्यांचे बंधू संदीप आवटी यांनी स्थायी समितीचे सभापती म्हणून काम पाहिले आहे. (After the father, two children also became the chairpersons of the standing committee)

ऑनलाईन ॲपद्वारे स्थायी समितीच्या सभापतिपदाची निवडणूक आज विशेष सभेत पार पडली. भाजपकडून मिरजेचे निरंजन आवटी यांनी चार अर्ज दाखल केले होते, तर काँग्रेसकडून फिरोज पठाण यांनी दोन अर्ज दाखल केले होते. ह्या दोघांचेही अर्ज छाननीत पात्र ठरले. त्यानंतर पीठासन अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी यांनी अर्ज माघारीसाठी १५ मिनिटांचा वेळ दिला. मात्र, दोन्ही उमेदवारांनी अर्ज ठेवल्याने मतदान घेण्यात आले.

पीठासन अधिकारी डूडी यांनी स्थायी समितीच्या सदस्यांना हात वर करुन मतदान करण्यास सांगितले. यामध्ये भाजपच्या ९ सदस्यांनी आवटी यांना मतदान केले, तर काँग्रेस आघाडीच्या ७ सदस्यांनी पठाण यांना मतदान केले. त्यामुळे ९-७ असा अपेक्षेप्रमाणे आवटी यांनी विजय मिळवला. डूडी यांनी निरंजन आवटी यांच्या विजयाची घोषणा केली. त्यावेळी महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारात आवटी समर्थकांनी गुलाल उधळून जल्लोष केला.

निरंजन यांचे वडील सुरेश आवटी यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेत दबावगट निर्माण केला होता. त्यामुळे स्थायी समितीचे मागील दोन सभापती हे मिरजेतील असूनही भाजपला तिसऱ्यांदा मिरजेतूनच उमेदवारी द्यावी लागली. त्यातून आवटी आणि भाजपने पालिकेतील सत्तेपाठोपाठ स्थायी समितीही ताब्यात घेण्याचा काँग्रस आघाडीचा करेक्ट कार्यक्रमाचा प्रयत्न हाणून पाडत स्थायी समिती ताब्यात ठेवण्यात यश मिळवले.

निरंजन आवटी यांच्या निवडीने मिरजेने सभापती निवडीत हॅट्‌ट्रिक साधली आहे, तर आवटी यांच्या कुटुंबातही तिसऱ्यांदा हे पद आले आहे. यापूर्वी सुरेश आवटी यांना २००९ मध्ये महाआघाडीच्या काळात सभापतिपद मिळाले होते, त्यानंतर भाजपच्या सत्तेत त्यांचे पुत्र संदीप यांनी २०१९-२० मध्ये, तर दुसरे पुत्र निरंजन यांना आता सभापतिपद मिळाले. त्यामुळे एकाच कुटुंबात तीनवेळा सभापतिपद येण्याचा विक्रम हा आवटी कुटुंबाच्या नावे नोंद झाला आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in