फडणवीसांनी दिल्लीतही जावे; म्हणजे पंतप्रधानही घराबाहेर पडतील : ठाकरेंचा टोला  - Fadnavis should also go to Delhi; That means even the Prime Minister will be out of the house : Uddhav Thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

फडणवीसांनी दिल्लीतही जावे; म्हणजे पंतप्रधानही घराबाहेर पडतील : ठाकरेंचा टोला 

सरकारनामा ब्यूरो 
सोमवार, 19 ऑक्टोबर 2020

विरोधकांनी यामध्ये राजकारण न आणता पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी केंद्राकडून काय मदत मिळवता येईल, याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

 

सोलापूर : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा पाहणी दौरा आम्ही जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री, पालकमंत्री हे घराबाहेर पडून दौरे करत आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी,"असे असेल तर फडणवीस यांनी दिल्लीतही जावे, नाही तर ते बिहारमध्ये जात आहेतच, दिल्लीत गेले तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही घराबाहेर पडतील,' असा टोला लगावला. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (ता. 19 ऑक्‍टोबर) सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्‍यातील नुकसानीचा आढावा घेतला. त्यानंतर सोलापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे बोलत होते.

ते म्हणाले 'पाऊस सुरू झाल्यापासून सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून होतो. दररोज आढावा घेतला जात आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी काळजी करू नये, जे काही करता येईल, ते तुमचे सरकार नक्की करणार आहे. पंचनाम्याची कामे झाल्यानंतर मदत देण्यात येईल. दरम्यान संकट अजूनही टळलेले नाही. वेधशाळेने पावसाचा आणखी इशारा दिला आहे, त्यामुळे जीवितहानी होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी सूचना मी प्रशासनाला केली आहे.'

'राज्यातील अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही केंद्राकडे मदतीची अपेक्षा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही तसे आश्‍वासन दिले आहे आणि केंद्राकडे मदत मागण्यात गैर काय आहे,' असा सवालही मुख्यमंत्र्यांनी केला. 

'मी मदतीची घोषणा करणार नाही; प्रत्यक्ष मदतच देणार आहे. आज शेतकऱ्यांचे डोळ्यात आश्रू आहे, ते पुसण्याचे काम मी करणार आहे,' असे आश्‍वासन ठाकरे यांनी या वेळी दिले. 

' देवेंद्र फडणवीस हे सुद्धा महाराष्ट्रातील जबाबदार राजकारणी आहेत. आपल्याला जनतेला दिलासा देण्याचे काम करायचे आहे. केंद्र आणि राज्य सरकार काय करले. यापेक्षा ज्या राज्याचे तुम्ही आहात. बिहारमध्ये प्रचार करण्यापेक्षा स्वतःचे राज्य आज नैसर्गिक आपत्ती आहे. राज्याला जर केंद्र सरकारच्या मदतीची गरज आहे, तर सर्वांनी एकवटून केंद्राकडे मागणं मागितले पाहिजे,' असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर तर पश्‍चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा, पुण्यातील काही भागांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. या बळिराजाच्या डोळ्यात पाणी आले असून अनेकांचे संसार पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. त्यांनी काय मागण्यापेक्षा, त्यांना काय देता येईल याकडे सरकारचे लक्ष आहे. विरोधकांनी यामध्ये राजकारण न आणता पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी केंद्राकडून काय मदत मिळवता येईल, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोप न करता सर्वांनी एकत्रित येऊन मदतीची मागणी करावी, अशी अपेक्षाही मुख्यमत्री उद्धव ठाकरे यांनी या वेळी व्यक्त केली. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख