पंक्चर काढणारा सायकल दुकानदार ते आमदार असा प्रवास केलेल्या मधुकर कांबळेंचे निधन

मधुकर कांबळे यांनी जत तालुक्यातून काँग्रेसच्या वरिष्ठ वर्तुळात असलेल्या उमाजी सनमडीकर यांचा पराभव केला होता.
 ex mla madhukar kamble is no more
ex mla madhukar kamble is no more

पुणे: सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मधुकर कांबळे यांचे आज निधन झाले. 1995 च्या विधानसभा निवडणुकीत मधुकर कांबळे यांनी तत्कालीन काँग्रेसचे आमदार उमाजी सनमडीकर यांचा पराभव केला होता. सायकल दुकानदार ते आमदार असा त्यांचा प्रवास होता. मनमिळाऊ स्वभावामुळे सांगली जिल्ह्यातील सर्व राजकीय नेत्यांशी त्यांचे मैत्रत्वाचे संबंध होते.

1995 साली सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या विरोधात एक लाट आली होती. या लाटेमध्ये शिवाजीराव नाईक, संपतराव देशमुख, राजेंद्र देशमुख, अजितराव घोरपडे, आणि मधुकर कांबळे हे पाच अपक्ष आमदार निवडून आले होते. या पाच आमदारांनी 1995 मध्ये स्थापन झालेल्या शिवसेना-भाजप युतीला पाठिंबा दिला होता. यातील शिवाजीराव नाईक यांना युती सरकारने मंत्रिपद बहाल केले होते. मधुकर कांबळे यांनी जत तालुक्यातून काँग्रेसच्या वरिष्ठ वर्तुळात असलेल्या उमाजी सनमडीकर यांचा पराभव केला होता. 

अतिशय सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली होती. 1995 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत विलासराव जगताप यांच्या मदतीने त्यांनी विजय मिळवला होता.  सायकलीचा पंक्चर काढणारा माणूस ते विधिमंडळ सदस्य असा त्यांचा प्रवास होता. विधानसभा निवडणुकीचा कार्यकाल पूर्ण झाल्यावर ते राजकारणातून थोडेसे दूर गेले होते. तालुक्यातील बदलत्या राजकीय समीकरणांत ते उपेक्षित राहिले. त्यांनी नंतरच्या काळात शिक्षणाच्या क्षेत्रात काम सुरू केले होते.

"मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होतो तेव्हा मधुकर कांबळे हे पंचायत समितीचे सदस्य होते. तेव्हापासून मी या एका धडाडीच्या कार्यकर्त्याला बघत होतो. सामाजिक कामाची आवड असलेला आणि जनतेशी सतत बांधीलकी मानून काम करणारा हा एक सच्च्या कार्यकर्ता होता. आम्ही अपक्ष आमदारांनी युती सरकारकडे सांगली जिल्ह्यातील पाणी योजनेना गती देण्यासाठी जो पाठपुरावा केला त्यात मधुकर कांबळे आघाडीवर होते. जत तालुका दुष्काळमुक्त झाला पाहिजे हे स्वप्न उराशी बाळगून मधुकर कांबळे काम करत होते.त्यांच्या निधनाने मला धक्का बसला आहे.
-शिवाजीराव नाईक, माजी मंत्री

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com