मोहिते-पाटलांमुळे सोलापूर झेडपीत राष्ट्रवादी बॅकफूटवर   - Due to Mohite-Patil NCP is on backfoot in Solapur Zilla Parishad | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

मोहिते-पाटलांमुळे सोलापूर झेडपीत राष्ट्रवादी बॅकफूटवर  

प्रमोद बोडके
बुधवार, 7 जुलै 2021

सत्तेपुढेही शहाणपण चालू शकते, याचाच प्रत्यय सध्या सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस घेत आहे.

सोलापूर : सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, ही आजपर्यंत रुजलेली म्हण आहे. पण, सोलापूर जिल्ह्याच्या विशेषतः जिल्हा परिषदेच्या राजकारणात ही म्हण खोटी ठरली आहे. अनुभवाला योग्य नियोजनाची जोड मिळाली, तर सत्तेपुढेही शहाणपण चालू शकते, याचाच प्रत्यय सध्या सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस घेत आहे. आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, भाजपचे नेते धैर्यशील मोहिते-पाटील आणि ऍड. दत्ता घोडके यांनी सत्तेपुढे शहाणपण चालत असल्याचे ठणकावून सांगितले आहे. (Due to Mohite-Patil NCP is on backfoot in Solapur Zilla Parishad)

राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्तेत आल्यावर 2019 मध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक झाली. राज्यात सत्ता आहे म्हटल्यावर झेडपीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीवर सत्तेचा प्रभाव पडेल, अशी शक्‍यता होती. राष्ट्रवादीचे अध्यक्षपदाचे उमेदवार त्रिभुवन धाईंजे आणि उपाध्यक्ष पदाचे उमेदवार विक्रांत पाटील यांचा पराभव करत भाजप पुरस्कृत आघाडीचे अनिरुध्द कांबळे यांची अध्यक्षपदी, तर दिलीप चव्हाण यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. 

हेही वाचा : आर. आर. पाटील यांचे भाकित खरे ठरले... कपिल पाटील मंत्री झाले

या निवडीत मोहिते-पाटील गटाचे सदस्य शीतलदेवी मोहिते-पाटील, स्वरुपाराणी मोहिते पाटील, अरुण तोडकर, गणेश पाटील, मंगल वाघमोडे, सुनंदा फुले या सहा सदस्यांची भूमिका महत्वाची राहिली. जिल्हा परिषदेच्या 2017 च्या निवडणुकीत मोहिते-पाटील गटाचे सदस्य राष्ट्रवादीच्या चिन्हावर विजयी झाले होते. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर या सदस्यांचा तांत्रिक प्रश्‍न उभा राहिला होता.

राष्ट्रवादीकडे दिग्गज नेते असूनही मोहिते-पाटील ठरले सरस

आपण ज्या पक्षाचे आहोत, त्या पक्षालाच मतदार करावे हा नैसर्गिक नियम व संकेत असतानाही मोहिते-पाटील गटाच्या सहा सदस्यांनी हा नियम मोडला. नियम मोडल्यानंतरही कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, धैर्यशिल मोहिते-पाटील आणि त्यांच्या गटाचे ऍड. दत्ता घोडके यांनी दाखविलेली तत्परता राष्ट्रवादीने शिकण्याजोगी आहे. सत्ता असून आणि राष्ट्रवादीकडे दिग्गज नेते असूनही मोहिते-पाटील या प्रकरणात सरस ठरले आहेत. कायद्याचे सखोल ज्ञान आणि वेळप्रसंगी साम, दाम, दंड, भेद ही नीती वापरण्याची धमक मोहिते-पाटील गटाने दाखविल्याने राष्ट्रवादीला या प्रकरणात बॅकफूटवर जावे लागले आहे. 

राष्ट्रवादीच्या हाती फारसे काही लागणार नाही  

जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे यांनी या सहा सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. जिल्हाधिकारी-उच्च न्यायालय-सर्वोच्च न्यायलय येथून हे प्रकरण आता पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे आले आहे. जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका सहा ते सात महिन्यांवर आल्या आहेत. या प्रकरणात जरी कारवाई झालीच तरीही त्यातून राष्ट्रवादीच्या हाताला फारसे काही लागण्याची शक्‍यता नाही. झेडपीमध्ये अनेकवेळा बंडखोऱ्या झाल्या; परंतु कारवाईपर्यंत कोणीही गेले नाही. राष्ट्रवादीने बंडखोरी कागदावर आणण्याचा प्रयत्न केला; परंतु या प्रयत्नाला इतर बाबी कमी पडल्याने राष्ट्रवादीला अपेक्षित रिझल्ट वेळेत मिळाला नाही. 

ऍड. घोडके ठरले टर्निंग पॉईंट 

मोहिते-पाटील गटाच्या सदस्यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत केलेल्या बंडखोरीचा ठपका ठेवून त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवावे. अपात्रतेची कारवाई विषय समिती सभापतीच्या निवडीपूर्वी व्हावी, या कारवाईतून संख्याबळ कमी झाल्यास विषय समित्यांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिल, असाच काहीसा डाव राष्ट्रवादीने आखला होता. राज्यात राष्ट्रवादीची सत्ता असल्याने हा डाव यशस्वीही होईल अशीच शक्‍यता होती.

मोहिते-पाटील गटाचे वकिल ऍड. दत्ता घोडके यांनी या प्रकरणातील लहान-सहान मुद्यांवर तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्यासमोर कायद्याचा अक्षरश: किस पाडला. त्यामुळे सभापती निवडीत त्या सहा सदस्यांना मतदानाचा हक्क बजावता आला. हे प्रकरण अधिक वेळ चालावे, यासाठी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयापर्यंत हा विषय नेण्यात आला. नंतरच्या काळात आलेली कोरोना महामारीही मोहिते-पाटील गटासाठी लाभदायकच ठरली. या सर्व प्रकरणात ऍड. घोडके हे टर्निंग पॉईंट ठरले हे विशेष.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख