मनोहर सपाटे-महेश कोठे यांच्यातील वाद विकोपाला; एकमेकांवर गंभीर आरोप - Dispute between Manohar Sapate and Mahesh Kothe escalated | Politics Marathi News - Sarkarnama

मनोहर सपाटे-महेश कोठे यांच्यातील वाद विकोपाला; एकमेकांवर गंभीर आरोप

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

माजी महापौर मनोहर सपाटे आणि महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते महेश कोठे यांच्यातील वाद आता विकोपाला पोहचला आहे. गंभीर आरोप-प्रत्यारोप करत दोघांनीही एकमेकांविरुध्द दंड थोपटले आहेत.

सोलापूर : माजी महापौर मनोहर सपाटे आणि महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते महेश कोठे यांच्यातील वाद आता विकोपाला पोहचला आहे. गंभीर आरोप-प्रत्यारोप करत दोघांनीही एकमेकांविरुध्द दंड थोपटले आहेत. त्यामुळे सोलापूरमधील राजकारण वातावरण सध्या तापल्याचे पाहायला मिळत आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी मोठ्या तयारीनिशी मुंबईत गेलेले महेश कोठे यांच्या पदरी शिवसेनेमुळे निराशा पडली अशी चर्चा आहे. त्यांचा अद्याप राष्ट्रवादीमध्ये अधिकृतपणे प्रवेश झालेला नाही. आमदारकीचे तिकीट मिळविण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी सोलापुरातील शहर उत्तर मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. 

माजी महापौर सपाटे हे कोठे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशावरून नाराज असल्याचे समजते. ते म्हणाले की, कोठे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना तर कधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भेटतात. त्यांच्या ताब्यात 30 वर्षे महापालिका असूनही त्यांनी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याशी गद्दारी केली. शिवसेनेसोबतही हेच झाले. त्यामुळे कोठेंनी पक्षनिष्ठा शिकवू नये.

कोठे हे राष्ट्रवादीत आल्यास पक्ष वाढविण्याऐवजी स्वत:चा गट वाढवतील. त्यांनी माझ्या वॉर्डात पुतण्याला उमेदवारी देऊन माझा पराभव केला. विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांचे काम केले. शहरातील पाणीपुरवठ्यासाठी आतापर्यंत दोनशे कोटींचा खर्च असून त्यातील पैसे कोठेंनी वाटून घेतल्याचा गंभीर आरोपही सपाटेंनी केला. मी विरोधात बोलण्यासाठी कोणाकडून पैसे घेतल्याचे दाखविल्यास राजकारणातून निवृत्ती घेईन, असे आव्हानही त्यांनी दिले.

कोठे यांनीही सपाटे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सपाटे यांनी उत्तर विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे अस्तित्व संपविले आहे. ते विधानसभा निवडणुकीत डिपॉझिटही वाचवू शकले नाहीत. पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. महापालिकेत निवडून येता आले नाही, त्यांचा बोलविता धनी नेमका कोण आहे?, अशी टीका कोठे यांनी केली. 

सपाटे यांना 2009 मध्ये पक्षाने उमेदवारी दिली नसतानाही अपक्ष निवडणूक लढविली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना फटकारले होते. माझ्याविरोधात बोलण्यासाठी कोणाकडून पैसे घेतले? भाजपला मदत होईल, असे वागणाऱ्या सपाटेंनी भाजपमध्ये गेल्याचे जाहीर करावे, असे कोठे म्हणाले.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख