उजनीच्या निर्णयाचे आभार मानत धवलसिंह मोहिते पाटलांनी सरकारकडे केली ही मागणी  - Dhawalsinh Mohite-Patil's demand to complete incomplete irrigation works in Solapur district | Politics Marathi News - Sarkarnama

उजनीच्या निर्णयाचे आभार मानत धवलसिंह मोहिते पाटलांनी सरकारकडे केली ही मागणी 

सुनील राऊत
शनिवार, 29 मे 2021

सोलापूर जिल्ह्यावरील अन्याय दूर करावा.

नातेपुते (जि. सोलापूर) :  इंदापूर तालुक्‍यातील 22 गावांना उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी देण्याच्या सर्वेक्षणाचा निर्णय रद्द केल्याबद्दल आभार. पण, सोलापूर जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्पाची कामे तातडीने मार्गी लावण्याचे आवाहन महाविकास आघाडी सरकारमधील सर्व नेत्यांना कॉंग्रेसचे नेते डॉ. धवलसिंह मोहीते-पाटील यांनी केले आहे. (Dhawalsinh Mohite-Patil's demand to complete incomplete irrigation works in Solapur district)

जलसंपदा विभागाने उजनी जलाशयाच्या उर्ध्व बाजूस बिगर सिंचन पाणी वापरातून उपलब्ध होणारे सांडपाणी उजनी जलाशयातून शेटफळगढे येथील मुठा उजव्या कालव्यात उचलून किलोमीटर 161 येथे खडकवासला स्थिरीकरण सिंचन प्रकल्पाच्या नावाखाली इंदापूर तालुक्‍याला पाच टीएमसी पाणी उचलण्यास राज्य सरकारने परवानगी दिली होती. त्या निर्णयाचे यापूर्वी 22 एप्रिल 2021 रोजी निर्गमीत केलेले शासकीय आदेश रद्द करण्यात आले आहेत. 

हेही वाचा :  दादा...आता दुकाने उघडण्याची परवानगी द्याच!

याबरोबरच उजनी जलाशय प्रकल्प सोलापूर जिल्ह्यासाठी असणारा हा प्रकल्प असूनही या उजनीवर अवलंबून असणार्या बार्शी उपसा सिंचन योजना 2.59 टीएमसी, सिना माढा उपसा सिंचन योजना 4.50 टीएमसी, दहिगाव उपसा सिंचन योजना 1.81 टीएमसी, भिमा-सिना जोड कलवा 3.15 टीएमसी, सांगोला उपसा सिंचन योजना दोन टीएमसी, एकरूख उपसा सिंचन योजना 3.16 टीएमसी, आष्टी उपसा सिंचन योजना एक टीएमसी, मंगळवेढा 35 गावांसाठी सहा टीएमसी, मंगळवेढा तालुका व दक्षिण सोलापूरच्या 22 गावाच्या पिण्याच्या पाणीयोजना, गेली अनेक वर्षापासून अजून पूर्ण झालेल्या नाहीत. 

या अर्थवट सिंचन योजना मार्गी लावण्यासाठी सरकारमधील सर्व नेत्यांनी एकत्रित येऊन युद्धस्तरावर कार्यवाही करावी. सोलापूर शहर व जिल्ह्यातील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा व शेती सिंचनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावून सोलापूर जिल्ह्यावरील अन्याय दूर करावा, असे आवाहन कॉंग्रेस नेते डॉ. मोहिते-पाटील यांनी केले आहे. 

डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी या बाबतचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांना ई मेलद्वारे केले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख