अजित पवार, वळसे पाटलांनी शिरूरमधील नेत्यांच्या कानात काय सांगितले? - Curiosity in the taluka about the new chairman of Shirur Bazar Samiti | Politics Marathi News - Sarkarnama

अजित पवार, वळसे पाटलांनी शिरूरमधील नेत्यांच्या कानात काय सांगितले?

नितीन बारवकर
गुरुवार, 8 जुलै 2021

प्रशासकीय कौशल्याबरोबरच जांभळकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व आमदार ऍड. अशोक पवार यांचा विश्‍वास व राजकीय मर्जी संपादन करताना ‘भागाचा समतोल’ही यशस्वीरीत्या राखला.

शिरूर (जि. पुणे)  : नेतेमंडळींचा निर्णय गुलदस्त्यात, इच्छुकांच्या जवळपास म्यानात गेलेल्या तलवारी, संचालकांचे कानावर हात अन्‌ छुप्या चाचपणीसाठी रात्री-अपरात्रीची मोबाईलवरील कुजबूज... शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीला अवघा एकच दिवस उरला असतानाही ठोस निर्णय होत नसल्याने या वादळापूर्वीच्या शांततेतून धक्कादायक किंवा अनपेक्षित काही घडणार काय, याबाबत तालुक्‍याच्या राजकीय पटलावरील उत्सुकता कमालीची ताणली गेली आहे. (Curiosity in the taluka about the new chairman of Shirur Bazar Samiti) 

शंकर जांभळकर यांनी वर्षभर वेगवान कारभार करून राजीनामा दिल्यानंतर, बाजार समितीचे नवे सभापती कोण होणार, याबाबत विविध राजकीय गोटात बरेच तर्क-वितर्क लढविण्यात आल्याने राजकीय स्तरावर या निवडीबाबत मोठी उत्कंठा निर्माण झाली. वास्तविक, सभापतिपदाचा हा विषय संपूर्णपणे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अखत्यारीतील असला; तरी विविध पटलांवर त्याबाबत चर्वितचर्वण झाल्याने तालुक्‍याचे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले. विरोधी भाजपची बाजार समितीत दोनच मते असली; तरी दोलायमान परिस्थितीत ही दोन मते देखील निर्णायक ठरू शकणारी असल्याने त्यांचेही महत्व एका रात्रीतून वधारल्याचे चित्र आहे. 

हेही वाचा : आम्ही म्हणू तोच सभापती होईल : भाजपच्या निर्णयामुळे निवडणुकीत नवा ट्विस्ट  

शिरूर तालुक्‍यातील 39 गावे आंबेगाव मतदार संघाला जोडल्यानंतर भागाचा समतोल साधण्याचा विषय प्रत्येक छोट्या-मोठ्या निवडणुकीत प्रकर्षाने समोर येतो. तसाच तो बाजार समितीच्या सभापती निवडीतही प्राधान्याने पुढे आला. त्यानुसार आलटून-पालटून संधी देण्याचे अलिखित ठरल्यावर सुरवातीची तीन वर्षे शिरूर भागातील शशिकांत दसगुडे हे सभापतिपदावर विराजमान झाले. रसातळाला गेलेली बाजार समितीची नौका त्यांनी चांगल्या कामांतून तरून नेली. 

दसगुडे यांच्यानंतर 39 गावांना प्रतिनिधित्व देताना शंकर जांभळकर यांना संधी देण्यात आली. या संधीचे सोने करताना जांभळकर यांनी रचनात्मक कामातून बाजार समिती नावारूपाला आणली. पारदर्शी कारभारातून ही नौका पैलतीरावर नेताना त्यांनी ही संस्था तब्बल अडीच कोटी रूपये नफ्यात आणली. दसगुडे यांनी रचलेल्या पायावर जांभळकर यांनी कळस चढविला. पण, त्याचवेळी दसगुडे यांना तीन वर्षे; तर जांभळकर यांना एकच वर्षे हा दुजाभाव झाल्याची हाकाटी सर्वसामान्यांतून सुरू झाली. त्यामुळे नकळत जांभळकर यांच्याविषयी केवळ संचालक मंडळात व त्यांच्या समर्थकांतच नव्हे; तर तालुक्‍यातील राजकीय पटलावरही हळहळ व्यक्त होऊन सहानुभूतीची लाट निर्माण झाली. 

बाजार समितीचा आलेख चढता ठेवणाऱ्या जांभळकरांबाबत ‘केलेल्या कामाचे हेच का फळ' अशी प्रतिक्रिया उमटली. प्रशासकीय कौशल्याबरोबरच जांभळकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व आमदार ऍड. अशोक पवार यांचा विश्‍वास व राजकीय मर्जी संपादन करताना ‘भागाचा समतोल’ही यशस्वीरीत्या राखला. दोन्ही भागातील नेते, पदाधिकाऱ्यांशीही त्यांनी आपुलकीचे संबंध प्रस्थापित केले. 

हेही वाचा : राष्ट्रवादीच्या नेत्यांचे ऐकायचे नसते तर आधीच करेक्ट कार्यक्रम केला असता…

या पार्श्‍वभूमीवर, शिरूर भागातील इच्छुकांमध्ये एकमत न झाल्यास तडजोड म्हणून पुन्हा जांभळकर यांच्याकडेच कारभार सोपविला जाणार असल्याची दबक्‍या आवाजात चर्चा आहे.  आंबेगावला जोडलेल्या 39 गावांतील प्रकाश पवार, मानसिंग पाचुंदकर यांनी आपण इच्छुक नसल्याचे स्पष्ट केल्याने वाट सोपी झाली आहे. ‘जांभळकर यांनी वर्षभरात चांगला कारभार केल्याने उर्वरित वर्षासाठीही त्यांच्याकडेच कारभार सोपवावा', अशी मागणी पाचुंदकर यांनी जाहीरपणे केली आहे. 

दुसरीकडे, प्रकाश पवार यांनी यापूर्वी सात ते आठ वर्षे या पदावर काम केले आहे. त्यामुळे ते स्वतःही या पदासाठी इच्छूक नसल्याचे त्यांनीच सांगितले आहे. शंकर जांभळकर ह्यांची प्रकाश पवार यांचे जुने समर्थक अशीच तालुक्यात ओळख आहे. त्यामुळे शिरूर तालुक्यातील एकाला संधी देऊन इतरांची नाराजी ओढावून घेण्यापेक्षा आगामी काळासाठी जांभळकर यांनाच संधी देण्याची भूमिका आमदार अशोक पवार हेही घेऊ शकतात, अशी एक शक्यता वर्तविली जात आहे.  

शिरूर भागातील आबाराजे मांढरे व ऍड. वसंतराव कोरेकर यांच्यासह विश्‍वास ढमढेरे व विकास शिवले यांचीही नावे सभापतिपदासाठी पुढे येऊ लागल्याने स्पर्धा टाळण्याचे दिव्य पक्षश्रेष्ठींना व विशेषतः आमदार पवार यांना पार पाडावे लागणार आहे. त्यातच आगामी काळातील जिल्हा परिषद, पंचायत समिती व प्रामुख्याने घोडगंगा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत 39 गावांचा भक्कम पाठिंबा मिळविण्यासाठी ‘कही पे निगाहे, कही पे निशाणा’ चा प्रयोग होऊ शकतो. 

बुक डिप्लोमसी जांभळकरांच्या पथ्यावर?

शिरूर बाजार समितीच्या गेल्या पन्नास वर्षातील कामकाजाचा आढावा घेणारी ‘कृषिरंग' ही स्मरणिका शंकर जांभळकर यांच्या सभापतिपदाच्या कारकिर्दीत तयार झाली आहे. या स्मरणिकेच्या प्रकाशनानिमित्त जांभळकर व प्रकाश पवार यांनी माजी आमदार पोपटराव गावडे यांच्यासह थेट मंत्रालय गाठले. तेथे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व आमदार अशोक पवार यांच्या उपस्थितीत प्रकाशन करताना सर्वांनी मिळून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही भेट घेतली. मात्र, या सर्व सोपस्कारात सभापतीपदाबाबत काय चर्चा झाली, याची वाच्यता झाली नाही. या ‘बुक डिप्लोमसी’तून जांभळकर यांनी पुन्हा सभापतिपद ‘बुक’ तर केले नाही ना, अशीही चर्चा रंगू लागली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख