काँग्रेस-राष्ट्रवादीत धुसफूस : वेल्ह्यातील प्रशासकीय इमारतीवरून राजकारण तापले

पंचायत समितीचे पदाधिकारी व दोन्ही जिल्हा परिषद सदस्य सामूहिक राजीनामे देतील.
Congress-NCP politics heated up from the administrative building in Velhe taluka
Congress-NCP politics heated up from the administrative building in Velhe taluka

वेल्हे : वेल्हे तालुक्यातील प्रशासकीय इमारतीवरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकारण चांगलेच तापले आहे. इमारतीच्या जागेसंदर्भात मागणीचा ठराव देऊनही जिल्हा परिषदेकडून वेल्ह्यास दुय्यम वागणूक मिळत आहे. वेल्हे तालुक्याच्या विकासासंदर्भात राजकारण होत असल्यास आम्हाला पदावर राहण्यास अधिकार नसून एका महिन्याच्या आत हा प्रश्न निकाली न निघाल्यास पंचायत समितीचे पदाधिकारी व दोन्ही जिल्हा परिषद सदस्य सामूहिक राजीनामे देतील. वेल्हे येथील पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत सभापती दिनकर सरपाले व जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे यांनी आज (ता. ४ जून) माहिती दिली. (Congress-NCP politics heated up from the administrative building in Velhe taluka)

या बाबत जिल्हा परिषद सदस्य नलावडे म्हणाले, वेल्हे तालुक्यातील प्रशासकीय इमारतीसाठी आमदार संग्राम थोपटे यांनी पाठपुरावा केला आहे. ऑक्टोबर २०२० मध्ये याला प्रशासकीय मान्यता मिळाली असून १५ कोटी ९९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तालुक्याच्या ठिकाणी या प्रशस्त इमारतीसाठी ४० गुंठेंच्या आसपास जागा आवश्यक आहे. याबाबत वेल्हे तहसीलच्या मागणीनुसार वेल्हे पंचायत समितीकडून तीन वेळा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत विषय मांडला आहे.  

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचना देऊन तर मागील महिन्याच्या (मे) महिन्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये जिल्हा परिषद अध्यक्षा व बांधकाम  सभापती यांनी पुढच्या सभेपर्यंत या विषयावर मार्ग काढला जाईल, असे आश्वासन देऊनही निव्वळ जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांच्या आडमुठेपणामुळे ते विकासाच्या कामात राजकारण करत आहेत. जिल्हा परिषदेच्या  सोमवारी (ता. १ जून) सर्वसाधारण सभेत इमारतीच्या ठरावावरुन चांगलीच वादळी चर्चा झाली. यावर तोडगा न निघाल्याने सभासदांनी सभात्याग केला होता, तर हा विषय येथे थांबला नसून आज पत्रकार परिषद आयोजित करत एका महिन्याच्या आत यावर तोडगा न निघाल्यास वेल्ह्याचे सभापती, उपसभापती व दोन्ही जिल्हा परिषद सदस्य राजीनामे देणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

या वेळी वेल्ह्याचे सभापती दिनकर सरपाले, उपसभापती अनंत दारवटकर, जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे, दुसरे जिल्हा परिषद सदस्य दिनकर धरपाळे आदी उपस्थित होते. 

वेल्ह्यातील प्रशासकिय इमारतीबाबत कोणतेही राजकारण नाही : शिवतरे

याबाबत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे म्हणाले की, वेल्ह्यातील प्रशासकिय इमारतीबाबत कोणतेही राजकारण केले जात नसून जिल्हा नियोजनच्या ऑनलाईन मिटींगमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी यांनी जागेची पाहणी करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

वेल्हे तालुक्यातील पंचायत समितीवर काँग्रेसची एकहाती सत्ता असून चारही सदस्य काँग्रेसचे व दोन्ही जिल्हा परिषद सदस्यसुद्धा काँग्रेसचे आहेत, तर जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. राज्यात जरी आघाडीचे सरकार असली तरी वेल्हे तालुक्यात बिघाडी असल्याचे चित्र दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com