कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल - Case filed against Congress MLA Praniti Shinde | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 17 जुलै 2021

विनापरवाना जमाव जमविणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन यावेळी शिंदे आणि कार्यकर्त्यांकडून करण्यात आले. 

सोलापूर : कोरोना प्रतिबंध नियमांचे तसेच जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून आंदोलन केल्याप्रकरणी कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह पक्षाच्या पदधिकाऱ्यांविरोधात सोलापूर शहरातील सदार बझार पोलिस ठाण्यत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Case filed against Congress MLA Praniti Shinde)

वाढती महागाई आणि गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेले पेट्रोल, डिझेल व गॅसचे दर या विरोधात विद्यार्थी कॉंग्रेसच्या वतीने सोलापुरातील डफरीन चौकातील सुपर पेट्रोल पंपासमोर शुक्रवारी (ता. 16) बोंबाबोंब आंदोलन आयोजित करण्यात आले होते. त्या आंदोलनात आमदार प्रणित शिंदे ह्या सहभागी झाल्या होत्या. 

हेही वाचा : ईडीकडून शिवसेनेच्या दोन नेत्यांची चौकशी सुरु; चंद्रकांतदादांचा गैाप्यस्फोट

आमदार प्रणिती शिंदे, विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमीर शेख, विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश डोंगरे, तिरूपती परकीपंडला, मनोज यलगुलवार, नगरसेवक विनोद भोसले, सचिन गायकवाड, विकी वाघमारे, देविदास गायकवाड यांच्यासह विद्यार्थी कॉंग्रेसच्या आणखी काही कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाल्याची नोंद सदर बझार पोलिस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस नाईक देशमुख हे करीत आहेत.

सोलापूर शहर आणि परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत. सभा, मोर्चा, आंदोलन करण्यावर बंदी आहे. तरीही, विनापरवाना जमाव जमविणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन या आंदोलनावेळी शिंदे आणि कार्यकर्त्यांकडून करण्यात आले. 

कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होईल, असे कृत्य आंदोलकांकडून झाले. विषाणूचा प्रादुर्भाव होण्यास जाणीवपूर्वक कृत्य करून प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले. ‘तुम्हाला काय करायचे ते करा, आम्ही बोंबाबोंब आंदोलन करणारच’, अशी भूमिका आंदोलकांकडून मांडण्यात आली होती. इंधन व जीवनावश्‍यक वस्तूंच्या दरवाढीतून सतत लुटमार होत असल्याच्या निषेधार्थ मोदी सरकारविरोधात या वेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, असे सदर बझार पोलिस ठाण्याचे हवालदार शब्बीर तांबोळी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलेले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख