capacity of solapur civil hospital will be increased collector says | Sarkarnama

सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमधील बेडची संख्या 100 ने वाढणार

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 9 जुलै 2020

कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी सोलापूर शहरातील बेडची संख्या वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे.

सोलापूर : कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी श्री छत्रपती शिवाजी सर्वोपचार रुग्णालयातील (सिव्हिल हॉस्पिटल) बेडची संख्या वाढवण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी व्यापक बैठक घेतली. या बैठकीतील चर्चेनुसार सिव्हील हॉस्पिटल मधील बेडची संख्या आणखी 100 ने वाढू शकते. यासाठी आवश्यक  तयारी करावी अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सर्व सबंधित विभाग प्रतिनिधींना दिल्या.

कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी सोलापूर शहरातील बेडची संख्या वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सिव्हील हॉस्पिटलच्या बी आणि सी ब्लॉकला भेट दिली. यावेळी महापालिकेचे आयुक्त पी.शिवशंकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, अधिष्ठाता डॉ.संजिव ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक प्रदिप ढेले, कोरोना विभाग प्रमुख डॉ. प्रसाद, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, आदी उपस्थित होते.

श्री. शंभरकर यांनी सिव्हिल हॉस्पिटल मधील बी ब्लॉक ची पाहणी केली. सार्वजनिक बांधकामाचे अधीक्षक अभियंता संतोष शेलार यांनी इमारती मध्ये काही किरकोळ फेरबदल करुन कशी रचना करता येईल याची माहिती जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सभागृहात बैठक झाली. जिल्हाधिकारी शंभरकर यांनी कोरोना रुग्णांवर उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमधील बेडची संख्या वाढवणे आवश्यक आहे, असे सांगितले. त्यासाठी बी ब्लॉक मध्ये 20 बेड आयसीयू आणि 80 बेड ऑक्सिजन सुविधेने युक्त असतील, अशा पध्दतीने तयारी करायला हवी. यावर श्री.ठाकूर, डॉ.पुष्पा आगरवाल यांनी आपली मते मांडली. तज्ञ समितीच्या डॉ. शशिकला सांगळे यांनी कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी आयसीएमआर च्या  मार्गदर्शक सूचनांनुसार कोरोना वॉर्ड तयार करताना काळजी घ्यायला हवी असे सांगितले. यानुसार बी ब्लॉकमध्ये 20 बेड आयसीयू आणि 80 बेड ऑक्सिजन सुविधेने युक्त असतील अशा पध्दतीने आवश्यक बदल करुन घ्यावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी शंभरकर यांनी श्री.शेलार यांना दिल्या.

या नव्या वॉर्डमध्ये उपचारासाठी सुमारे पाचशे डॉक्टर कर्मचारी, नर्स यांची आवश्कता आहे, असे डॉ. ऋत्विक जयकर यांनी सांगितले. यामध्ये सुमारे 140 डॉक्टर, 240 नर्सेस आणि 180 सफाई कर्मचारी यांची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले. याबाबत आवश्यक त्या कर्मचाऱ्यांची सेवा घेण्यात यावी अथवा नव्याने नियुक्त करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिल्या नव्याने नियुक्ती करण्यासाठीची जाहिरात तत्काळ देण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले. या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संभाजी धोत्रे, महानगरपालिकेचे उपायुक्त अजयसिंग पवार, डॉ. विठ्ठल धडके, डॉ.विदया टिरणकर, डॉ. सुहास सरवदे, डॉ. अग्रजा चिटणीस वरेरकर, डॉ. सुरेश कंदले, आदी उपस्थित होते.

edited by swarup jankar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख