संतप्त आंदोलनकर्त्यांनी जयंत पाटलांचा पुतळा जाळला

पाच दिवस उलटूनही सरकारचा लेखी आदेश अद्याप मिळाला नाही.
संतप्त आंदोलनकर्त्यांनी जयंत पाटलांचा पुतळा जाळला
Burning of Jayant Patil's statue at Bhimanagar

टेंभुर्णी  (जि. सोलापूर) : उजनी धरणातून (Ujani dam) इंदापूर (Indapur) तालुक्‍याला 5 टीएमसी पाणी देण्यासंदर्भातील आदेश रद्द केल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी माध्यमांसमोर येऊन तोंडी आश्वासन दिले. यानंतर पाच दिवस उलटूनही सरकारचा लेखी आदेश अद्याप मिळाला नाही. त्यामुळे भीमानगर येथे जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर ऊर्फ भैया देशमुख (Bhaiya Deshmukh) यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलनास बसलेल्या आंदोलनकर्त्यांनी संतप्त होऊन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. (Burning of Jayant Patil's statue at Bhimanagar)

उजनी धरणातून जे 5 टीएमसी पाणी इंदापूरला नेण्यासाठी शासनाने मंजूर केले आहे ते त्वरीत रद्द करावे, या मागणीसाठी भीमानगर येथे उजनी धरणाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन सुरू आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी इंदापूरला पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय रद्द केल्याचे जाहीर केले. या संदर्भातील शासन आदेशाची प्रत हातात येईपर्यंत धरणे आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय प्रभाकर उर्फ भैया देशमुख व त्यांच्या सहकार्यांनी घेतला आहे. सलग 14 दिवसांपासून हे धरणे आंदोलन सुरू आहे. 

आदेशाची प्रत देण्यासाठी विलंब होत होत असल्याने आज संतप्त आंदोलनकर्त्यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

या वेळी त्यांच्या विरोधात बोंबाबोंब केली. यामध्ये जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर भैय्या देशमुख, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ताभाऊ व्यवहारे,रयत क्रांती संघटनेचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. सुहास पाटील, विठ्ठल मस्के,अमोल जगदाळे, सचिन पराडे पाटील, रामदास खराडे, मल्हारी गवळी, प्रंशात महाडिक, धवल पाटील, मंगेश वाघ आदी सहभागी झाले होते.

गोविंद बागेसमोर खर्डा-भाकर आंदोलन

मोहोळ : उजनी जलाशयातील पाच टीएमसी पाणी इंदापूरला वळवण्याच्या निर्णयाला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्थगिती देऊन तो आदेश रद्द केला असल्याचे सांगितले. मात्र, अद्याप याबाबत अजून कुठलाच अध्यादेश निघाला नाही. म्हणून सव्वीस मे रोजी राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे बारामती येथील निवासस्थान गोविंद बाग येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण उजनी धरण बचाव समितीच्या वतीने खर्डा भाकर आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती या समितीचे समन्वयक नागेश वनकळसे यांनी दिली.

याबाबत वनकळसे म्हणाले की, उजनी जलाशयातील सोलापूरच्या वाट्याचे हक्काचे पाणी 'सांडपाणी'या गोंडस शब्दाचा वापर करून पालक मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी पळविले आहे. या निर्णयाच्या विरोधात सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. परिणाम वेगवेगळ्या मार्गाने आंदोलने होत आहेत.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांसमोर इंदापूरला पाणी नेण्याचा आदेश रद्द केल्याचे सांगितले. मात्र, याबाबत कुठलाही शासकीय अध्यादेश निघाला नाही.  त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा व्यथा व भविष्यात येणारी संकटे सांगण्यासाठी प्रतिनिधीक स्वरूपात शांततेच्या मार्गाने गोविंद बाग येथे 26 मे रोजी एक दिवस खर्डा भाकर आंदोलन करण्यात येणार आहे. या संदर्भात बारामती पोलिस  ठाण्याला पत्र दिले आहे, असेही त्यांनी सांगितले. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in