भाजपचे प्रदेश पदाधिकारी म्हणतात, 'जलयुक्तच्या कामाची चौकशी होऊद्याच'  - BJP office bearer's demand to inquire into the work of Jalayukta Yojana | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपचे प्रदेश पदाधिकारी म्हणतात, 'जलयुक्तच्या कामाची चौकशी होऊद्याच' 

सावता नवले 
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

जलयुक्त शिवार योजना ठेकेदार जगविण्याची व निधी जिरविण्याची रोजगार हमी योजना बनली आहे.

कुरकुंभ (जि. पुणे) : राजकीय वरदहस्तामुळे दौंड तालुक्‍यात जलयुक्त शिवार योजना, तसेच विविध योजनांच्या माध्यमातून झालेली रस्त्याची कामे ठेकेदार जगविण्याची व निधी जिरविण्याची रोजगार हमी योजना बनली आहे. या कामांची चौकशी करून कारवाई होईपर्यंत सरकारकडे पाठपुरावा करणार आहे, असे भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस वासुदेव काळे यांनी केली. 

दौंड तालुक्‍यात जलयुक्त शिवार योजनेतून अनेक गावांत झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे तलाव, ओढ्यावरील बंधारे फुटून पुरामुळे शेती, पिके व पूल वाहून गेले आहेत. शेतकऱ्यांबरोबरच सरकारच्या कोट्यवधी रूपयांच्या नुकसानीला जबाबदार कोण, असा प्रश्न तालुक्‍यातून विचारला जात आहे. 

भाजप-शिवसेनेच्या सरकारने जलयुक्त शिवार योजनेचा गवगवा करत ओढ्यावरील बंधारे, छोटे तलाव, ओढे व तलाव खोलीकरणाच्या कामांसाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिला होता. तसेच, तालुक्‍यातील औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांकडून सीएसआर फंडाच्या माध्यमातून लाखो रूपये निधी गोळा केला. हा निधी पदाधिकारी, ठेकेदार, संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांच्या सोयीनुसार व फायद्यासाठी खर्च करण्यात आला, अशी चर्चा आहे. त्यामुळे अनेक गावांत अधिक नफा कमविण्यासाठी निकृष्ट दर्जाची कामे झाली आणि हीच निकृष्ट दर्जाची कामे यंदा पावसाळ्यात जनता व सरकारच्या नुकसानीचे कारण बनली आहेत. 

मळद येथील निकृष्ट दर्जाचा फुटलेला तलाव त्याचेच उदाहरण आहे. तलाव फुटून आलेल्या पुरामुळे, मळद, रावणगाव, नंदादेवी, खडकी, स्वामी चिंचोली येथील ओढ्यावरील बंधारे फुटले. लगतची शेती, पिकांचे नुकसान झाले. रस्ते, पूल वाहून गेल्याने दळणवळणाची गैरसोय होत आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांकडून संताप व्यक्त होत आहे. 

दौंड तालुक्‍यात झालेल्या जलयुक्त शिवार योजनेतून आणि सीएसआर फंडातून झालेल्या कोट्यवधी रूपयांच्या कामांची चौकशी करावी. दोषी ठेकेदार व अधिकाऱ्यांविरुद्ध जबाबदारी निश्‍चित करून फौजदारी गुन्हे दाखल केले, तरच निकृष्ट कामांना आळा बसून निधीचा योग्य वापर होऊ शकेल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

जलयुक्त शिवार योजनेतून व जिल्हा परिषदेच्या छोटे पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून झालेल्या निकृष्ट कामांची चौकशीची मागणी या पूर्वीच परिषदेच्या सर्वसाधारण सभेत केली आहे, तसेच आगामी सभेतही केली जाईल. मळद येथील फुटलेल्या तलावाच्या कामाची माहिती मिळावी; म्हणून संबंधित विभागाला लेखीपत्र दिले आहे, असे पुणे जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे यांनी सांगितले. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख