सोलापूरच्या विमानतळासाठी अजिदादांकडून 50 कोटींचा निधी 

विमानतळासाठी आवश्‍यक असणाऱ्या वन विभागाच्या 32 हेक्‍टर जमिनीवरील वनीकरणाचा शिक्का काढण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
Ajit Pawar approves Rs 50 crore for Solapur airport
Ajit Pawar approves Rs 50 crore for Solapur airport

मुंबई : सोलापूर शहरालगतच्या बोरामणी विमानतळासाठी 34 हेक्‍टर खासगी जमिनीच्या संपादनासाठी 50 कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर करण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (ता. 15 सप्टेंबर) दिले. तसेच, विमानतळासाठी आवश्‍यक असणाऱ्या वन विभागाच्या 32 हेक्‍टर जमिनीवरील वनीकरणाचा शिक्का काढण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. 

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात सोलापूरच्या बोरामणी विमानतळाच्या प्रश्नासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज विशेष बैठक पार पडली. 

या वेळी सोलापूरचे पालकमंत्री तथा पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, आमदार प्रणिती शिंदे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, सामान्य प्रशासन (विमान चालन) विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महाराष्ट्र विमानतळ प्राधीकरण तसेच भारतीय विमान प्राधिकरणचे वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते. 

सोलापूर शहरात होटगी येथे सद्य स्थितीत विमानतळ आहे. मात्र, या विमानतळाचा वापर सध्या नॉन शेड्यूल फ्लाईट (अनुसूची नसलेली विमान उड्डाणे) करिता करण्यात येत आहे. परंतु हे विमानतळ छोटे असल्यामुळे "ए-320' व त्या प्रकारच्या विमानांकरीता उपयुक्त नाही. तसेच, हे विमानतळ शहरात असल्याने विमानतळानजिक असलेले साखर कारखाने व नागरी वस्तीमुळे या विमानतळाचा विस्तार करणे शक्‍य नसल्याचे भारतीय विमान प्राधिकरणाने या पूर्वीच स्पष्ट केले आहे. 

सोलापूर शहरापासून सुमारे 13 किलोमीटर अंतरावर सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गालगत बोरामणी व तांदूळवाडी येथे नवीन ग्रीन फील्ड विमानतळ विकसित करण्यात येत आहे. हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी सहभाग तत्वावर उभारण्यात येणार आहे. त्यानुसार महाराष्ट्र विमान विकास कंपनीने बोरामणी-तांदूळवाडी या ठिकाणी सुमारे 549 हेक्‍टर जमिनीचे संपादन पूर्ण केले आहे. उर्वरित सुमारे 34 हेक्‍टर खासगी जमिनीच्या संपादनासाठी निधीची आवश्‍यकता होती. 

या जमिनीच्या संपादनासाठी 50 कोटी रुपयांचा निधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने मंजूर केला. यामुळे शेतकरी व जमीन मालकांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळणार आहे. तसेच, या व्यतिरिक्त प्रकल्पासाठी आवश्‍यक 32 हेक्‍टर वन जमिनीच्या निर्वनीकरणाची प्रक्रिया नागपूर वन विभागाच्या कार्यालयाशी समन्वय साधत तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. 

या विमानतळामुळे सोलापूरसारख्या महत्वाच्या शहराला हवाई दळणवळणाची सुविधा मिळणार असून त्यामुळे शहराच्या प्रगतीत भर पडणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com