अजित पवारांनी मानला भालकेंचा शब्द : काळे-महाडिकांच्या कारखान्यास मदत  - Ajit Pawar accepted Bhalke's word: help to Kale-Mahadik's sugar factory | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

अजित पवारांनी मानला भालकेंचा शब्द : काळे-महाडिकांच्या कारखान्यास मदत 

भारत नागणे 
शनिवार, 10 ऑक्टोबर 2020

काळे-महाडिक यांच्या साखर कारखान्यांना अजित पवार यांनी थकहमी मंजूर करून आमदार भालके यांच्या शब्दाला किंमत दिली. 

पंढरपूर : विठ्ठल परिवाराशी निगडीत असलेले पण भारतीय जनता पक्षाशी सलगी केलेल्या कल्याण काळे आणि माजी खासदार धनंजय महाडीक यांच्या साखर कारखान्यांना राज्य सरकारने मदत करावी, यासाठी आमदार भारत भालकेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे शिष्टाई केली होती. त्यांची ही शिष्टाई यशस्वी झाली आहे. काळे-महाडिक यांच्या साखर कारखान्यांना अजित पवार यांनी थकहमी मंजूर करून आमदार भालके यांच्या शब्दाला किंमत दिली आहे. 

मागील वर्षीच्या गाळप हंगामात बंद असलेले विठ्ठल, सहकार शिरोमणी आणि भीमा या तीनही सहकारी साखर कारखान्यांपुढे आर्थिक समस्या निर्माण झाली होती. थकीत एफआरपी आणि विविध बॅंकांच्या कर्जामुळे इतर सर्व मार्ग बंद झाले होते. राज्य सरकारने हमी घेतल्याशिवाय कारखाने सुरू करणे अशक्‍य होते. 

विठ्ठल कारखान्याचे आमदार भारत भालके हे गेल्या चार महिन्यांपासून थकहमी मिळावी, यासाठी प्रयत्न करत होते. अनेक प्रयत्नानंतर त्यांच्या कारखान्याला हमी देण्याची सरकारने तयारी दर्शवली होती. परंतु विठ्ठल परिवाराशी सलग्न असलेल्या शिरोमणी वसंतराव काळे आणि भीमा हे दोन साखर कारखाने सुरू होणार का? या विषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यातच काळे- महाडिक हे भाजपत असल्यामुळे राजकीय गुंता निर्माण झाला होता. कारण, राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची राज्यात सत्ता आहे. 

साखर कारखाने बंद राहिल्यामुळे उस गाळपाचा प्रश्न निर्माण होईल. शिवाय शेतकरी आणि कामगारांचे देखील मोठे नुकसान होईल, याचा विचार करून आमदार भारत भालके यांनी काळे आणि महाडिक यांच्या साखर कारखान्यांना मदत करावी, असा शब्द अजित पवारांकडे टाकला होता. त्यानंतर पवार यांनी मदतीचे आश्वासन दिले होते. याशिवाय भालके यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर 9 ऑक्‍टोबर रोजी राज्य सरकारने काळे-महाडिक यांच्या कारखान्याला हमी दिली आहे. 

आमदार भारत भालके यांनी केलेल्या या यशस्वी मध्यस्थीमुळे या दोन्ही साखर कारखान्यांना मोठी आर्थिक मदत झाली आहे. शिवाय सरकारच्या हमीमुळे गाळप हंगाम सुरु होण्याचा मार्ग देखील मोकळा झाला आहे. यापुढच्या काळात काळे-महाडिक हे मतदारसंघात कोणती राजकीय भूमिका घेतात, याकडे पंढरपूरचे लक्ष लागले आहे. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख