पद मिळताच आठच दिवसांत राष्ट्रवादी सोडून धरली भाजपची वाट ! - Within eight days of getting the post, he left the NCP and joined the BJP | Politics Marathi News - Sarkarnama

पद मिळताच आठच दिवसांत राष्ट्रवादी सोडून धरली भाजपची वाट !

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 14 फेब्रुवारी 2021

पद पदरात पडल्यानंतर चारच दिवसांत राष्ट्रवादीला रामराम ठोकून त्यांनी भाजपचे माप ओलांडले. 

एरंडोली (जि. सांगली)  : एरंडोली येथील उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि सदस्यांचे "कारभारी' यांनी शनिवारी (ता. 13 फेब्रुवारी) भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. या मंडळींनी आठ दिवसांपूर्वीच भाजपशी काडीमोड घेऊन राष्ट्रवादीचा पंचा गळ्या घातला होता. गावच्या राजकारणात "सात अधिक दोन' चे गणित जमवून उपसरपंचपद मिळवण्यासाठी पक्षांतर करण्यात आले होते. पद पदरात पडल्यानंतर चारच दिवसांत राष्ट्रवादीला रामराम ठोकून त्यांनी भाजपचे माप ओलांडले. 

आमदार सुरेश खाडे यांनी उपसरपंच महेश मोरे, सदस्य आत्माराम जाधव, सचिन पोतदार, सदस्यांचे कारभारी प्रसाद चौगुले यांच्यासह कार्यकर्ते बाळासाहेब नलवडे, नितीन माने यांना प्रवेश दिला. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष परशुराम नागरगोजे, तालुकाध्यक्ष शंकर शिंदे, दिनकर भोसले आदी उपस्थित होते. 

गेल्या आठवड्यात या मंडळींनी राष्ट्रवादीचे नेते मनोज शिंदे यांच्या उपस्थितीत आणि तालुकाध्यक्ष तानाजी दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीत प्रवेश घेतला होता. एरंडोली ग्रामपंचायत निवडणुकीत या गटाच्या श्री जान्हवी पॅनेलचे सात सदस्य विजयी झाले होते. विरोधी जय जान्हवी पॅनेल व वॉर्ड दोन यांच्या आघाडीचे आठ सदस्य विजयी झाले. दोन सदस्य व्यंकोचीवाडी येथील जय हनुमान पॅनेलचे होते. 

श्री जान्हवी पॅनेलला उपसरपंच होण्यासाठी व्यंकोचीवाडीतील दोन सदस्यांच्या पाठिंब्याची गरज होती. त्यासाठी सात अधिक दोन अशा नऊ सदस्यांनी आणि काही नेत्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यात एरंडोली राष्ट्रीय पेयजल योजनेचे अध्यक्ष उत्तम माने, कॉंग्रेसच्या विशाल पाटील गटाचे समर्थक बी. के. पाटील यांचा समावेश होता. 

या खेळीमुळे महेश मोरे यांना बिनविरोध उपसरपंच होता आले. नऊ फेब्रुवारीला त्यांची निवड झाली. त्यानंतर चारच दिवसांत त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करत राष्ट्रवादीला धक्का दिला. आता बी. के. पाटील आणि उत्तम माने हे राष्ट्रवादीच राहणार की तेही माघारी फिरणार, याकडे लक्ष असेल. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख