राजू शेट्टींच्या सत्तेला महाआघाडीकडूनच सुरूंग; सदस्याच्या पक्षांतरामुळे स्वाभिमानी अडचणीत  - Swabhimani Shetkari Sanghatana in trouble in Udgaon due to change of party of Gram Panchayat member | Politics Marathi News - Sarkarnama

राजू शेट्टींच्या सत्तेला महाआघाडीकडूनच सुरूंग; सदस्याच्या पक्षांतरामुळे स्वाभिमानी अडचणीत 

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 28 जानेवारी 2021

माजी खासदार राजू शेट्टी यांचे नेतृत्व याच उदगावमधून पुढे आले होते.

जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) : गेली दहा वर्षापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वर्चस्व राहिलेल्या उदगाव (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायतीच्या सत्तासंघर्षाला नाट्यमय वळण लागले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सत्तेला सुरुंग लावत महाविकास आघाडीने सत्ता काबीज करण्याची खेळी केली. ‘स्वाभिमानी'च्या सदस्या कलीमून नदाफ यांनी महाविकास आघाडीचा रस्ता धरल्याने महाविकास आघाडीला सत्तास्थापनेची संधी मिळू शकणार आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेबरोबर माजी खासदार राजू शेट्टी यांचे नेतृत्व याच उदगावमधून पुढे आल्यामुळे उदगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे विशेष लक्ष होते. गेल्या दहा वर्षांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सत्ता होती.

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत स्वाभिमानीला नऊ, तर महाविकास आघाडीला आठ जागा मिळाल्या होत्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सत्ता स्थापनेचा दावा केला जात असतानाच सदस्या नदाफ यांनी महाविकास आघाडीत प्रवेश केल्याने सत्तास्थापनेचे स्वाभिमानीचे मनसुबे उधळले गेले आहेत.

मंत्री यड्रावकर गट, शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेत संधी मिळू शकणार असल्याने पाच वर्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर विरोधी बाकावर बसण्याची वेळ येणार आहे. सहा प्रभागात सतरा सदस्य असून कॉंग्रेस, राष्ट्रवादी, यड्रावकर गट, शिवसेनेने ताकदीनिशी सत्तांतरासाठी खेळी केली आहे. दहा वर्षांची सत्ता काबीज करण्यासाठी महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी नाट्यमय घडामोडी केल्या आहेत. सदस्या नदाफ या महाविकास आघाडीत सामील झाल्याने स्वाभिमानीचे मनसुबे उधळले आहेत.
 

गेल्या दहा वर्षात गावचा विकास साधला आहे. यामुळे मतदारांनी स्वाभिमानीला कौल दिला आहे. मात्र, पैशाचा खेळ करून सत्तेसाठी विरोधकांनी खेळी केली आहे. गावच्या विकासात राजकारण करणार नाही. यापुढे विकासासाठीच कार्यरत राहणार आहे. पाच वर्ष विरोधी बाकावर बसावे लागले तरी आम्ही विकासासाठी प्रयत्नशील राहू.

- सावकर मादनाईक (स्वाभिमानी शेतकरी संघटना)
 

उदगावच्या विकासासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील आहे. गावातील प्रलंबित प्रश्‍न लक्षात घेऊन ते सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचेच वर्चस्व राहील. गावच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येवून सत्ताधाऱ्यांविरोधात निवडणूक लढविली. आता सत्ता आल्यानंतर मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करू.

-स्वाती सासणे (सभापती, जि.प. समाज कल्याण विभाग)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख