गेल्या २० वर्षांत किती टॅंकरभाडे मिळविले, हे महाडिकांनी जाहीर करावे : सतेज पाटलांचे आव्हान - Satej Patil criticizes Mahadevrao Mahadik from tanker in Gokul | Politics Marathi News - Sarkarnama

गेल्या २० वर्षांत किती टॅंकरभाडे मिळविले, हे महाडिकांनी जाहीर करावे : सतेज पाटलांचे आव्हान

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 24 एप्रिल 2021

ते दूध उत्पादकांसाठी नव्हे तर स्वत:चे टॅंकर सुरू राहावेत, यासाठी ते फिरत आहेत.

गारगोटी  (जि. कोल्हापूर) : कोल्हापूर जिल्हा दूध संघाकडून (गोकुळ) दर पंधरा दिवसाला माजी आमदार महादेवराव महाडिक 80 लाखांचे टॅंकर भाडे घेतात. एक वर्षाला टॅंकर भाड्यातून त्यांना 19 कोटी मिळतात. यासाठी ते तीन-तेरा-तेवीस या बिलांच्या तारखांचा प्रचार करीत आहेत. ते दूध उत्पादकांसाठी नव्हे तर स्वत:चे टॅंकर सुरू राहावेत, यासाठी ते फिरत आहेत. गेल्या 20 वर्षांत किती टॅंकर भाडे मिळविले हे त्यांनी जाहीर करावे, असे आव्हान गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी महाडिक यांनी दिले. 

कूर (ता. गारगोटी) येथे राजर्षी शाहू शेतकरी आघाडीतर्फे उमेदवारांच्या प्रचारार्थ ठरावधारकांच्या मेळाव्यात पालकमंत्री सतेज पाटील बोलत होते. या वेळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार के. पी. पाटील उपस्थित होते. 

दत्तात्रेय उगले यांनी प्रास्ताविक केले. रणजित पाटील यांनी उमेदवारांची ओळख करून दिली. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, उपाध्यक्ष मधुकर देसाई, के. जी. नांदेकर, सर्व उमेदवार ठरावधारक उपस्थित होते. विश्वनाथ कुंभार यांनी आभार मानले.

हेही वाचा : ज्या ज्या संस्थांना महाडिकांचा हात लागला, त्या सगळ्या संस्था बुडाल्या

कागल : ‘‘माजी आमदार महादेवराव महाडिक यांना आम्ही सतत टँकर बद्दल विचारत होतो. काल त्यांनी आपले 40 टँकर असल्याची जाहीर कबुली दिली. ज्या ज्या संस्थांना त्यांचा स्पर्श झाला त्या सगळ्या संस्था बुडाल्या आहेत. त्यांच्या घशातुन दूध संघ काढून, तो सर्वसामान्य उत्पादक शेतकऱ्यांच्या मालकीचा करण्यासाठीच आमची ही लढाई आहे,’’ असे प्रतिपादन कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.

कागलमध्ये गोकुळ दूध संघ निवडणुकीत राजर्षी शाहू आघाडीच्या प्रचारात पाटील बोलत होते. स्वागत व प्रास्ताविकपर भाषणात भैया माने यांनी आघाडीच्या उमेदवारांची ओळख करून दिली. 

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, सत्ताधारी 3, 13 आणि 23 तारखेला दूध बिले देत असल्याचे सांगत आहेत. गवळीसुद्धा दहा दिवस झाले की बिल देतो. यामध्ये तुम्ही नवीन काय केलं? तुमचा कारभार जर एवढा चोख आणि दूध उत्पादकांच्या हिताचा असेल तर मग निवडणुकीची भीती तुम्हाला का वाटते?.

गोकुळची सत्ता आपण दिली, तर आम्ही वचन दिले आहे. गोकुळ हा दूध उत्पादकांच्या मालकीचा करू. मल्टीस्टेट करण्यापासून आपण सर्वांनी संघर्ष करत खासगी होण्यापासून वाचविला आहे. हा संघर्ष वाया जाता कामा नये. आता पुढची लढाई आहे, सत्ता द्या, परिवर्तन करा. दुधाला लिटरमागे दोन रुपये दरवाढ देऊ. पारदर्शी, चोख कारभार करू.

पशुखाद्य व पशु वैद्यकीय सेवा यामध्ये वाढ करू. हे सर्व जर आम्ही केले नाही तर पाच वर्षांनी आम्हाला दारामध्ये उभे करून घेऊ नका. सत्ताधारी गोकुळ कसा चालवला हे सांगत आहेत, ते किती खोटं बोलत आहेत. आम्हाला सत्ता देऊन बघा, दूध उत्पादक महिलांना पाच वर्ष दीपावली व भाऊबीज अशी देऊ की, भाऊराया कसे असावेत, तर हसन मुश्रीफ, बंटी पाटील यांच्यासारखे असावेत, असे वाटले पाहिजे, असे मुश्रीफ म्हणाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख