विष्णूअण्णांना हरवून 'जायंट किलर' ठरलेल्या संभाजी पवारांनी मदन पाटलांनाही चितपट केले होते 

ती त्यांची शेवटची विजयी निवडणूक ठरली.
Sambhaji Pawar had defeated   father Vishnu Anna and son Madan Patil
Sambhaji Pawar had defeated father Vishnu Anna and son Madan Patil

सांगली : घरंदाज कुस्तीगिराच्या कुटुंबातून आलेल्या संभाजी पवार यांनी 1967 नंतर दीड दशक कुस्तीचा आखाडा गाजवला आणि 1986 च्या विधानसभा पोटनिवडणुकीत कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत थेट विधानसभेत धडक दिली. पवार यांनी ज्येष्ठ नेते विष्णूअण्णा पाटील यांचा 1986 मध्ये आणि त्यानंतर 2009 मध्ये त्यांनी विष्णूअण्णांचे चिरंजीव आणि तत्कालीन मंत्री मदन पाटील यांचा पराभव केला. त्यांनी पाटील पिता-पुत्रांना हरवण्याची किमया साधली होती. 

सांगली विधानसभा मतदार संघातून चारवेळा विजयी झालेले माजी आमदार आणि कुस्तीचा आखाडा गाजवणारे नामांकित बिजली मल्ल संभाजी हरी पवार (वय 80) यांचे रविवारी मध्यरात्री निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी अंजली, मुलगे पृथ्वीराज आणि गौतम, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सोमवारी सायंकाळी कृष्णा नदीला साक्षी ठेवत हजारो सांगलीकरांनी त्यांना निरोप दिला. अमरधाम स्मशानभूमीलगतच्या मैदानावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. 

कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्याला लावला सुरुंग 

घरंदाज कुस्तीगिराच्या कुटुंबातून आलेल्या संभाजी पवार यांनी 1967 नंतर दीड दशक कुस्तीचा आखाडा गाजवला आणि 1986 च्या विधानसभा पोटनिवडणुकीत कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत विधानसभेत धडक दिली. तेथून पुढील तीन दशके सांगलीकरांच्या मनावर त्यांनी अधिराज्य गाजवले. 

पोटनिवडणुकीत ठरले 'जायंट किलर' 

ही गोष्ट 1986 ची. ज्येष्ठ नेते वसंतदादा पाटील राजस्थानच्या राज्यपालपदी गेल्याने सांगलीत 1986 मध्ये पोटनिवडणूक लागली. ज्येष्ठ नेते विष्णूअण्णा पाटील यांना कॉंग्रेसने उमेदवारी दिली. आधी नामदेवराव मोहिते यांनी दादा घराण्याविरोधात लढा देत कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्याला धडक दिली होती. विरोधी तत्कालीन जनता पक्षाने कॉंग्रेसमधील नाराजांची मदत घेताना संभाजी पवार यांच्या रूपाने नवखा नगरसेवक असलेला उमेदवार दिला. 

पवार यांनी घराणेशाहीविरोधात रान उठवत शड्डू ठोकला. बिजली मल्ल नाव सार्थ ठरवत त्यांनी सांगलीचा राजकीय आखाडाही जिंकला. त्यानंतर पुढे दोन वेळा पराभव आणि तीनवेळा विजय मिळवत त्यांनी सांगलीच्या राजकारणावर ठसा उमटवला. त्यांच्या पहिल्या विजयाने त्यांना जायंट किलर अशी ओळख दिली. ती कायमची राहिली. 

नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश 

विधानसभेत ते जनता दलाचे गटनेते होते. विरोधी बाकावरून सभागृह दणाणून सोडणारा आमदार म्हणून राज्यभर त्यांची चर्चा व्हायची. पुढे त्यांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांना दोनवेळा पराभव पत्करावा लागला. 2009 मध्ये मात्र त्यांनी विष्णूअण्णांचे चिरंजीव आणि तत्कालीन मंत्री मदन पाटील यांचा पराभव करीत ते पुन्हा चौथ्यांदा आमदार झाले. ती त्यांची शेवटची विजयी निवडणूक ठरली. 

राजारामबापूंचे मानसपुत्र ते जयंतरावांशी संघर्ष

संभाजी पवार यांनी कारंदवाडी (ता. वाळवा) येथे सर्वोदय सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली होती. पहिल्या गळीत हंगामाच्या प्रारंभावेळी माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, ज्येष्ठ नेते शरद पवार यांची हजेरी होती. कालांतराने हा कारखाना आर्थिक अरिष्टात सापडला. त्याचा राजारामबापू कारखान्याशी करार झाला. त्यातून राजारामबापू कारखान्याने सर्वोदय ताब्यात घेतला आणि त्यानंतर मालकी हक्कावरून संघर्ष पेटला. लोकनेते राजारामबापू पाटील यांचे मानसपुत्र संभाजी पवार विरुद्ध बापूंचे चिरंजीव जयंत पाटील असा पराकोटीचा राजकीय संघर्ष सुरू झाला. डाव्या समाजवादी चळवळीचा कारखाना म्हणून सर्वोदयची ओळख होती. "सर्वोदय'चा वाद ही त्यांच्या उत्तरआयुष्यातील कायमची खंत राहिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com