चंद्रकांतदादांसारखे खाते मिळाले असते तर सोन्याचे रस्ते केले असते - Rural Development Minister Hasan Mushrif criticizes BJP state president Chandrakant Patil | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

इंदापूरला उजनीतून पाणी देण्याचा निर्णय रद्द : जयंत पाटील यांची घोषणा
मंत्रीमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीसाठी महाविकास आघाडीतील प्रमुख नेते सह्याद्रीवर दाखल. एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि मुख्य सचिव सिताराम कुंटे हेही उपस्थित आहेत.
मराठा आरक्षणासाठीची भाजपची महत्वाची बैठक आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी होत आहे. यासाठी रविंद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, गिरीश बापट, प्रवीण दरेकर उपस्थित आहेत.

चंद्रकांतदादांसारखे खाते मिळाले असते तर सोन्याचे रस्ते केले असते

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 12 एप्रिल 2021

गावच्या विकासासाठी ठरावधारकांनी निधी मागितल्यास त्यात गैर काय, अशी उलट विचारणाही मुश्रीफ यांनी केली.

कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील हे भाग्यवान होते. त्यांना मोठमोठी खाती मिळाली. सार्वजनिक बांधकाम यासारखे अत्यंत महत्वाचे खाते त्यांना मिळाले. मला जर हे खाते मिळाले असते, तर कोल्हापूर जिल्ह्यात मी सोन्याचे रस्ते केले असते. मात्र,  चंद्रकांतदादांना ही संधी साधता आली नाही, अशा शब्दांत राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांतदादांवर टीका केली. 

कोल्हापूर येथील पत्रकार परिषदेत मुश्रीफ बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील, बांधकाम सभापती हंबीरराव पाटील, शिक्षण सभापती प्रवीण यादव, समाजकल्याण सभापती स्वाती सासणे, महिला बालकल्याण सभापती पद्‌माराणी पाटील उपस्थित होत्या.

कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या (गोकुळ) निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेत पदाधिकारी बदल केला जाईल. एक मे या महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाने विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या कार्यकालाची सांगता होणार आहे. सर्वपक्षीय सदस्यांना प्रत्येकी 20 लाख रुपये देण्याची घोषणा केली होती. यातील 50 टक्‍के म्हणजेच प्रत्येकी 10 लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाल्याचे पत्र मुश्रीफ यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील यांच्याकडे सुपूर्द केले. 

मुश्रीफ म्हणाले, (स्व.) यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे अनावरण करताना भेदभाव न करता सर्व सदस्यांना समान म्हणजे प्रत्येकी 20 लाख रुपये निधी देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार 3054 या हेडअंतर्गत प्रत्येकी 10 लाख रुपये कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा परिषद सदस्यांना 6 कोटी 70 लाख रुपयांचा निधी देण्यात येत आहे. तसेच 2515 या हेडअंतर्गत प्रत्येकी 10 लाख रुपये दिले जाणार आहेत. मात्र, वित्त विभागात तांत्रीक अडचण आल्याने थोडा विलंब होत आहे. मात्र गोकुळ निवडणुकीपर्यंत हा निधी देखील सदस्यांना देण्यात येईल. 

गोकुळचं तेवढं बघा

निधी देताना आपण कोणताही भेदभाव करत नाही. सर्व सदस्यांना समान निधी देत आहे. त्यामुळे सदस्यांनीही गोकुळचे बघावे, असे हसन मुश्रीफ यांनी सांगताच एकच हशा पिकला. उद्या गोकुळच्या ठरावधारकांनी आपल्या गावच्या विकासासाठी निधी मागितला तर तोदेखील दिला जाईल, असे मुश्रीफ यांनी या वेळी स्पष्ट केले. गावच्या विकासासाठी ठरावधारकांनी निधी मागितल्यास त्यात गैर काय, अशी उलट विचारणाही मुश्रीफ यांनी केली.

सदस्यांची पालकमंत्र्यांकडे तक्रार 

जिल्हा परिषदेतील विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल चार महिन्यापुर्वीच संपला आहे. त्यामुळे सतत पदाधिकारी बदलाची मागणी होत आहे. दोन्ही मंत्र्यांनीही पदाधिकारी बदलास संमती दिली आहे. मात्र जाता जाता पदाधिकारी शिल्लक रक्‍कम खर्च करण्याच्या मागे लागले आहेत. याबाबत सदस्यांनी पालकमंत्र्यांकडे तक्रार केली होती. त्यानुसार नवीन आर्थिक वर्षातील निधी खर्च करु नका, अशी सूचना सतेज पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय माने यांना दिली असल्याचे सांगण्यात आले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख