कोल्हापूर : पुणे विभाग पदवीधर किंवा शिक्षक मतदार संघापैकी कोणत्याही एकाची उमेदवारी कॉंग्रेसकडे घ्यावी, त्याला निवडून आणण्याची जबाबदारी आपली राहिल, असं जाहीररित्या सांगणाऱ्या गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी शिक्षक मतदार संघातील कॉंग्रेसचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांना विजय करुन किंगमेकर ठरले आहेत.
ज्यांची ओळख केवळ करवीर तालुका, कोल्हापूर जिल्हा आणि शैक्षणिक संस्थांपुरती मर्यादित होती, अशा प्रा. जयंत आसगावकर यांच्याकडे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यांतील प्रत्येक शिक्षक मतदारांपर्यंत पोचवत त्यांना विजयी करण्यामध्ये गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील बाहुबलीची भूमिका निभावली आहे.
पुणे पदवीधरमधून अरुण लाड गेल्यावेळच्या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार होते. त्यांनी मतांचा चांगला पल्ला गाठला होता. थोडक्यात त्यांना पराभव पत्करावा लागला होता. तसेच, त्यांच्याकडे सहकार, राजकीय पातळीवर नाव आहे.
याउलट, शिक्षक मतदार संघातील प्रा. जयंत आसगावकर हे शिक्षक, शैक्षणिक संस्था तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील एक चांगली व्यक्तिमत्व म्हणून ओळख आहे. अशा व्यक्तीमत्वासाठी पाटील यांनी आपली यंत्रणा कामाला लावली होती. मतदारांच्या याद्या, त्यांना सोशल मीडियावरून संदेश, कॉंग्रेस उमेदवार म्हणून त्यांच्याकडून भविष्यात होणाऱ्या कामांचा अजेंडा सर्व शिक्षण संस्थेसह वैयक्तिक शिक्षकांपर्यंत पोचविण्यासाठी सतेज पाटील यांनी आपली यंत्रणा सक्षम आणि सतर्क ठेवली.
गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीतही शिवसेना उमेदवार राजेश क्षीरसागर यांना पराभवाचा धक्का देत उद्योजक चंद्रकांत जाधव यांना आणि कोल्हापूर दक्षिणमधून त्यांचा पुतण्या ऋतुराज पाटील यांना पहिल्याच प्रयत्नांत आमदार करण्यामध्ये सतेज पाटील यांनी बाहुबलीची भूमिका निभावली आहे. त्यामुळे, सतेज पाटील यांनी आपला शब्द खर करुन दाखवत कॉंग्रेस पक्षात आपला दबदबा निर्माण केला आहे.

