स्वराज्याचे सरसेनापती गुजर यांच्या वाड्याच्या तटबंदीची वारसांनीच केली नासधूस 

आजपर्यंत या ऐतिहासिक वास्तूचे जतन व्हावे हा शुध्द हेतू व प्रयत्न येथील ग्रामपंचायत, इतिहासप्रेमी व प्रतापराव गुजरांच्या वारसांचा दिसून येत होता.
Prataprao Gujar's palace was destroyed .jpg
Prataprao Gujar's palace was destroyed .jpg

खटाव (जिल्हा सातारा ) :  स्वराज्याचे तिसरे सरसेनापती श्रीमंत प्रतापराव गुजर यांच्या भोसरे (ता.खटाव ) येथील वाड्याच्या तटबंदीची नासधूस अत्याधुनिक घरे बांधण्यासाठी त्यांच्याच वारसांनी केल्याची नुकतीच घटना घडली.

आजपर्यंत या ऐतिहासिक वास्तूचे जतन व्हावे हा शुध्द हेतू व प्रयत्न येथील ग्रामपंचायत, इतिहासप्रेमी व प्रतापराव गुजरांच्या वारसांचा दिसून येत होता. मात्र, त्याचे जतन कसे होईल याचे निश्चित धोरण ना ग्रामस्थांनी ठरवले ना वारसांनी. या हानीबद्दल संपूर्ण राज्यातून नाराजीचा सूर आळवला जात आहे. पण त्याच बरोबर पुन्हा सर्व इतिहास प्रेमी व ग्रामस्थांनी ही वास्तू जतन करण्यासाठी एकत्र यावे असे, आवाहन सोशल मीडियावरून करण्यात येत आहे.

संबधित वाडा हा सरसेनापती प्रतापराव गुजर यांचा भुईकोट किल्ला वा गढी या प्रकारातला आहे. वाड्याला बुरूज, परकोट होते. सद्यस्थितीत हा वाडा संपूर्ण खासगी मालकीचा आहे. ही जागा जवळपास 25 कुटुंबांच्या मालकीची आहे. आज या वाड्याची पश्चिम, वायव्य व उत्तरेकडील तटबंदी नेस्तनाबून झाली आहे. उत्तरेकडील 40 फूट लांबीची तटबंदी असलेल्या भागांपैकी काही भाग पाडण्यात आला. मात्र, पूर्व व दक्षिणेकडची 400 ते 500 फूट लांबीची तटबंदी सुस्थितीत आहे. दुर्दैवान या वास्तूचे जतन व्हावे व भावी पिढीला इतिहासाची माहिती व्हावी या भावनेचा अभाव स्थानिकांच्यामध्ये प्रकर्षाने दिसून आला. 

त्याचबरोबर ही जागा मालकीची असल्याने यामध्ये मध्यस्थी करण्याचीही कोणाची इच्छा दिसून येत नसल्यानेच हा ऐतिहासिक ठेवा पाडण्याचे धाडस करण्यात आल्याचे दृष्टीपथास येते. सरसेनापतींच्या जन्मभूमित त्यांच्याच वारसांकडून वास्तूंचे जतन होण्याऐवजी इतिहास पुसण्याचे काम चालू असल्याची खंत इतिहासप्रेमी व्यक्त करत आहेत. याच सरसेनापतींचा पराक्रम पाहून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भोसर्याला ' ब ' वर्ग पर्यटनाचा दर्जा मिळवण्यासाठी जीवाचे रान केले. हा विरोधाभास वाटू लागला आहे. आपल्या पुर्वजांच्या पराक्रमाची साक्ष देत असलेला हा वारसा आपल्याशी युगसंवाद साधतो. मात्र हा युगसंवाद या पिढीकडे तितक्या ताकदीने पोहोचल्याचे दिसत नाही. त्यासाठी अशा इतिहाससाक्षी समृध्दीकडे बघण्याची संवेदनशील दृष्टीचा या पिढ्यांमध्ये अभाव जाणवतो.

या दुर्दैवी घटनेनंतर ऐतिहासिक वास्तू व तिचे संवर्धन हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ग्रामस्थ, राजकीय नेते, इतिहासप्रेमी व स्वयंसेवी संस्थानी सदरची ऐतिहासिक वास्तूची पडझड रोखण्याच्या दृष्टीने काही पाऊले उचलण्याची गरज आहे. हा अनमोल ठेवा विकासाच्या नावाखाली जमिनदोस्त करून भोसर्याची ओळख नष्ट करण्यात येत आहे. शिवछत्रपतींच्या सरदाराचा इतिहास जमीनदोस्त करून वारसांनी प्रतापराव गुजरांच्या काळजाचा बुरुजच नेस्तनाभूत केला आहे. येणार्या पिढीला येथे मराठ्यांचा सरसेनापती प्रतापराव गुजरांचा याच ठिकाणी वाडा होता हे सांगण्यासाठी त्या जागेच्या फोटोचा आधार घ्यायचा नसेल तर सर्वांनी एक साथ उभे राहण्याची गरज आसल्याचा सुर सर्वच स्तरांतून आळवला जात आहे. 

''भोसरेमध्ये 90 टक्के ऐतिहासिक वास्तू आजही खासगी मालमत्ता आहेत. सर्वच वंशजांना त्याचे महत्व असेल असे नाही. त्यामुळे समस्त शिवप्रेमी, इतिहास प्रेमी, अभ्यासक, कायदेतज्ञांनी या वास्तू सार्वजनिक मालकीच्या होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. अन्यथा दगड, मातीच्या रुपात कवडीमोल भावात महाराष्ट्राचा इतिहास विकाला जाईल." असे इतिहासप्रेमी लहुराज बजरंग दरेकर (इनामदार ), यांनी सांगितले.   
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com