चंद्रकांतदादांच्या कोल्हापुरात भाजपला धक्का; गडहिंग्लजचा एकमेव नगरसेवकही राष्ट्रवादीत 

पाच वर्षे पूर्ण होण्याआधीच नगरसेवक पक्ष सोडून गेल्याने हा भाजपला मोठा धक्का समजला जातो.
The only BJP corporator from Gadhinglaj also joined the NCP
The only BJP corporator from Gadhinglaj also joined the NCP

गडहिंग्लज (कोल्हापूर) : प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा गृहजिल्हा असलेल्या कोल्हापुरात भारतीय जनता पक्षाला महापालिका निवडणुकीच्या तोंडावर धक्का बसला आहे. गडहिंग्लज नगरपालिकेत गेल्या वेळी निवडून आलेल्या दोन नगरसेवकांपैकी एकाने वर्षभरापूर्वीच जनता दलात प्रवेश केला होता. आता उरल्या सुरल्या एका नगरसेवकानेही राष्ट्रवादी कॉंग्रेसची वाट धरली आहे. त्यामुळे गडहिंग्लजमध्ये भाजप शून्यावर आला आहे. 

शशिकला पाटील यांनी वर्षापूर्वी जनता दलात, तर दोन दिवसांपूर्वीच दीपक कुराडे राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. पाच वर्षे पूर्ण होण्याआधीच नगरसेवक पक्ष सोडून गेल्याने हा भाजपला मोठा धक्का समजला जातो. 

पूर्वीपासून गडहिंग्लज पालिकेची सत्ता कॉंग्रेस, जनता दल, राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या भोवतीच फिरत आली आहे. एकदा सर्वपक्षीय महालक्ष्मी विकास आघाडीला सत्ता मिळाली. शिवसेना आणि भाजपला सत्तेपर्यंत पोचण्याइतके यश येथे आतापर्यंत मिळवता आलेले नाही. एखाद दुसरा नगरसेवक निवडून येण्यापुरते त्यांचे अस्तित्व राहिले.

पालिकेची गेल्या वेळची पंचवार्षिक निवडणूक शिवसेना-भाजप युतीने लढविली. त्यात भाजपचे दोन आणि शिवसेनेचा एक नगरसेवक सभागृहात दाखल झाला. जनता दल सत्तेत विराजमान झाले. त्याच वेळी युतीच्या तीनही नगरसेवकांनी जनता दलाला पाठिंबा देत सत्तेत सहभाग नोंदवला. 

पालिका निवडणूक झाली तेव्हा राज्यात भाजप-सेनेचीच सत्ता होती. या सरकारकडून शहरासाठी विकास निधी मिळेल, या अपेक्षेने जनता दलानेही युतीला पालिका सत्तेत सामावून घेतले; परंतु अपेक्षित असा निधी मिळालाच नाही. यामुळे जनता दलाचा हिरमोड झालाच, शिवाय भाजपच्या नगरसेवकांनाही त्यांच्या प्रभागासाठी एक पैचाही निधी मिळाला नाही. याचेच पर्यवसान दोन्ही नगरसेवकांच्या पक्षांतरात झाल्याची चर्चा आहे. ही खंत कुराडे यांनी राष्ट्रवादी प्रवेशावेळीही जाहीरपणे बोलून दाखविली. 

मुश्रीफ-घाटगे लढत रंगणार 

यंदा नोव्हेंबरमध्ये पालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. या रिंगणात मंत्री हसन मुश्रीफ यांच्या राष्ट्रवादीविरुद्ध भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांच्या नेतृत्वाखालील आघाडी निश्‍चित मानली जाते. घाटगे यांना आता पालिका निवडणुकीसाठी वेगळी व्यूहरचना करून नव्याने मांडणी करावी लागणार आहे. त्यासोबत दोन्ही नगरसेवकांनी पक्ष सोडल्याच्या कारणांचे चिंतनही आगामी काळात सर्वांनी करण्याची आवश्‍यकता आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com