भाजपकडून उदयनराजेंचा अवमान : केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये शब्द देऊनही संधी नाही!    - MLA Shashikant Shinde criticizes BJP | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

भाजपकडून उदयनराजेंचा अवमान : केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये शब्द देऊनही संधी नाही!   

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 11 जुलै 2021

भाजपने त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये संधी देण्याचा शब्द देऊन राजीनामा द्यायला लावला, असल्याची चर्चा साताऱ्यात होती.

कोरेगाव : स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून काही ठराविक विचारसरणीचे लोक महाराष्ट्राचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. छत्रपतींच्या गादीला डावलण्याचे काम कोण करत आहे, हे सुद्धा सामान्य जनतेला चांगले माहीत आहे. भारतीय जनता पक्षाने (BJP) शब्द दिला होता, तर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये संधी न देऊन खासदार उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosale) यांचा एकप्रकारे अवमान केला आहे, अशी टीका आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी केली आहे. (MLA Shashikant Shinde criticizes BJP) 

हेही वाचा : डॅा. भारती पवारांच्या राज्यमंत्रीपदामागे भाजपचा आहे 'हा' मनसुबा!

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आणि भाजपची भूमिका याविषयी आमदार शिंदे म्हणाले की ''खासदार शरद पवार यांचे उदयनराजे भोसले यांच्यावर विशेष प्रेम होते. ते आमच्या पक्षाचे खासदार होते. त्यांच्याबरोबर आम्ही अनेक वर्षे एकत्रितपणे काम केले. त्यांनी मुदतीपूर्व राजीनामा दिला. भाजपने त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये संधी देण्याचा शब्द देऊन राजीनामा द्यायला लावला, असल्याची चर्चा साताऱ्यात होती. मी देखील तसे ऐकून होतो. 

कारण या निवडणुकीच्या प्रक्रियेत मी होतो. मात्र, नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये खासदार उदयनराजे भोसले व खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना संधी न देऊन पश्‍चिम महाराष्ट्रावर भाजपने अन्याय केला आहे. या दोघांपैकी एकाला संधी मिळाली असती, तर पश्‍चिम महाराष्ट्राच्या विकासासाठी ते चांगले झाले असते. पश्‍चिम महाराष्ट्रात भाजपची विशेष अशी ताकद नाही. राष्ट्रवादी-काँग्रेससह अन्य मित्रपक्षांचे नेते स्वत:कडे खेचून भाजपने आपली ताकद असल्याचे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.'' असेही शिंदे म्हणाले. 

हेही वाचा : आम्ही काका-पुतण्यांच्या ताटाखालचे मांजर नाही: काँग्रेस नेत्याची पवारांवर कडवट टीका 

खासदार उदयनराजे भोसले हे आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असते, तर त्यांच्या शब्दाला राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये वजन असते. राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांनी निश्‍चितपणे विकासकामे केली असती. मात्र, भाजपने त्यांचा केवळ राजकीय वापर करून घेतला. त्यांचा योग्य तो सन्मान ठेवला नाही, याचे दु:ख वाटते, असेही आमदार शिंदे यांनी नमूद केले.

Edited By - Amol Jaybhaye 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख