भाजपला स्वपक्षातील बड्या नेत्याकडूनच धक्का : मिरजेतील धक्कातंत्र महापौर निवडणुकीतही रंग दाखवणार  - In the Miraj Panchayat Samiti elections, the BJP was threatened by its own party leader | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपला स्वपक्षातील बड्या नेत्याकडूनच धक्का : मिरजेतील धक्कातंत्र महापौर निवडणुकीतही रंग दाखवणार 

प्रमोद जेरे 
शनिवार, 20 फेब्रुवारी 2021

सतत आपल्याच वर्चस्वाची आसक्ती असलेल्या याच नेत्यांनी भाजपतील नाराजांना एकत्र करण्यास सुरुवात केली, ज्याची सुरुवात मिरज पंचायत समितीपासून झाली आहे. 

मिरज : मिरज पंचायत समितीमधील उपसभापती निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या सत्तेला धक्का देणारे दुसरे तिसरे कोणी नसून भाजपतील एक बडा नेता असल्याचे पुढे येत आहे. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या नेत्यांनी याबाबत फार काही केले नसले तरी पंचायत समितीमधील कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी मात्र याच संधीचा अचूक लाभ घेऊन पंचायत समिती आता भाजपच्या ताब्यात राहिलेली नाही, हा संदेश पसरवण्याचा डाव अगदी सफाईदारपणे साधला. 

अर्थात, ज्या भाजपच्या माध्यमातून राजकारणात बस्तान बसविले त्याच नेत्यांनी अशा प्रकारे पक्षाला धक्का देणे, ही नवी डोकेदुखी आता भाजपतील नेत्यांच्या मागे लागली आहे. शिवाय, या नेत्यांच्या कुरघोड्यांचे वारु नेमके आवरायचे तरी कसे? हेही मोठे आव्हान भाजपतील प्रस्थापित नेत्यांसमोर आहे. 

पंचायत समितीच्या इतिहासात प्रथमच मिरज पंचायत समितीवर भाजपने सत्ता मिळवली. त्याचे श्रेय आमदार सुरेश खाडे यांनाच द्यावे लागेल. या निवडणुकावेळीही याच धक्‍क्‍याचे सूत्रधार नेते मालगावसह मिरज पूर्व भागात काही जागांवर भाजपच्या कमळ चिन्हाऐवजी अपक्ष म्हणून त्यांच्या मर्जीतील उमेदवारांना भाजपचा पाठींबा मागत होते. पण त्यावेळी आमदार खाडे हे पक्षाच्या चिन्हावरच निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर ठाम राहिले आणि त्यामुळेच मिरज पंचायत समितीमध्ये निव्वळ भाजपचे वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले. 

असाच पवित्रा याच नेत्यांनी महापालिका निवडणुकीतही मिरज शहरातील एका कॉंग्रेसच्या माजी महापौरांना निवडून आणण्यासाठी घेतला होता. पण, तेथील भाजपचे उमेदवार तयारीचे निघाल्याने याच नेत्यांच्या अंदर-बाहरचे पितळ त्यांनी उघडे पाडले. त्यामुळे सतत आपल्याच वर्चस्वाची आसक्ती असलेल्या याच नेत्यांनी भाजपतील नाराजांना एकत्र करण्यास सुरुवात केली, ज्याची सुरुवात मिरज पंचायत समितीपासून झाली आहे. 

मुळात पंचायत समितीमधील सगळ्या निर्णयाची सुत्रेही याच नेत्यांच्या हाती होती. ज्यांच्या आदेशाने यापूर्वी सभापतिपदाचे नाव आणि त्यांचे राजीनामे ठरत. त्यांना दोघा नाराज सदस्यांना थोपविणे अवघड नव्हते. पण, गेल्या काही दिवसांत भाजपमधील सगळेच निर्णय आपल्या मनाप्रमाणे व्हावेत, ही महत्वकांक्षा अधिकच प्रबळपणे व्यक्त होऊ लागली.

परंतु भाजपमधील प्रस्थापित नेत्यांनी त्यांच्या महत्त्वाकांक्षेची डाळ शिजू दिली नसल्याने याच नेत्यांनी राष्ट्रवादीसोबतचा घरोबा वाढवला आणि भाजपतील नाराजांना सोबत घेऊन मिरज पंचायत समिती पदाच्या निवडणुकीत पहिला दणका दिला. त्यामुळे येत्या काही दिवसांत मिरज पंचायत समितीमधील या धक्का तंत्राचे पडसाद जिल्ह्याच्या राजकारणावर निश्‍चितपणे उमटणार आहेत. 

येत्या काही दिवसांत होणाऱ्या महापौरपदाच्या निवडणुकीतही याच महत्वाकांक्षी नेत्याकडून वेगळी चाल खेळली जाण्याची शक्‍यता आत्ताच महापालिका वर्तुळामध्ये वर्तवली जाती आहे. एकूणच मिरज पंचायत समितीमधील हे धक्कातंत्र आता जिल्ह्याच्या राजकारणात अंमलात येणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख