मी कोथरूडला गेलो; पण, पवारही माढ्याला गेले होते : चंद्रकांत पाटील 

पक्ष हितासाठी ते करावे लागते.
I went to Kothrud; But, Pawar had also gone to Madha: Chandrakant Patil
I went to Kothrud; But, Pawar had also gone to Madha: Chandrakant Patil

सांगली : "पूजा चव्हाण प्रकरणात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडून मी न्यायाची अपेक्षा व्यक्त केली. त्यांनी त्यावर असे उत्तर देणे अपेक्षित नव्हते. मी कोथरूडला गेलो, ठीक आहे! पण, तेही माढ्याला गेले. एकदा घोषणा करून मागे फिरले. त्याचे उत्तर त्यांनी द्यावे,'' असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवारांना दिले. 

सांगली येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत रविवारी (ता. 14 फेब्रुवारी) पाटील बोलत होते. शरद पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्याबाबतच्या प्रश्‍नावर ""ज्यांना गाव सोडून लढावे लागते, त्यांना काय उत्तर द्यायचे'', असा टोला लगावला होता. त्यावर पाटील यांनी पवारांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की "शरद पवार मुंबईत राहतात. त्यांचे मतदार यादीतील नाव मुंबईत आहे. बाहेर जाऊन राहणे, यात चूक काय आहे. पक्ष हितासाठी ते करावे लागते.'' 

चंद्रकांतदादांचा पडळकरांना सल्ला 

पवार यांच्याबाबत आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा टोकाची आणि जोरदार टीका केली. त्याबाबत विचारले असता पाटील म्हणाले, पडळकर सोलापूरला पूर्वी जेव्हा टोकाचे बोलले, त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सूचना दिली होती. त्यानंतर गोपीचंद यांनी बऱ्यापैकी सुधारणा केल्या आहेत. पवारसाहेब काही कमी टोचून बोलत नाहीत. तरीही, गोपीचंद यांना पुन्हा सल्ला, "तेच बोलायचं असतं, नीट बोलायचं असतं.' 

कोरोना काळातील कारनामे उघड करू 

चंद्रकांत पाटील म्हणाले, "राज्य सरकार पैशाचे करते काय, हा मोठा प्रश्‍न आहे. बंगल्याची दुरुस्ती आणि गाड्यांची खरेदी किती करावी? कोरोना काळात दिली गेलेली टेंडर कशी काढली? रुग्णांना दुपारचे जेवण दिले, एक ताट 400 रुपयांना... आश्‍चर्य आहे. अधिवेशनात यावर चर्चा होईल आणि यांचे कारनामे आम्ही उघड करू. ठेकेदार आमचे मित्रच आहेत, त्यांना किती पैसे मिळाले, आम्हाला माहिती आहे.'' 


या सरकारला शिवशाहीचे सरकार कसे म्हणायचे? 

राज्यात शिवशाहीचे सरकार असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्ष हे ठोकशाहीचे सरकार आहे. इथे न्याय होत नाही. तो होत असता तर धनंजय मुंडे प्रकरण असो किंवा पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण असो, सरकारने तटस्थपणे कारवाई केली असती. ती दडपली जात आहेत, असा आरोप पाटील यांनी केला. 

चंद्रकांत पाटील म्हणाले, ""धनंजय मुंडे प्रकरणात रेणू शर्माने इतके गंभीर आरोप केले. मुंडे यांनी स्वतः कबूल केले की त्यांचे करुणा शर्मासोबत संबंध आहेत, त्यांना दोन मुले आहेत, त्यांना त्यांचे नाव लावले आहे. त्यांच्या त्या पत्नीने आरोप केला की धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मुलांना बंगल्यात कोंडून ठेवले आहे. इतके गंभीर घडूनही त्याकडे कानाडोळा केला जातो.'' 

"आता पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातही एका मंत्र्याचे नाव येते आहे. ते दरवाजा तोडायला सांगत आहेत, मोबाईल ताब्यात घे म्हणत आहेत. त्याच्या ऑडिओ क्‍लीप समोर आल्या आहेत. त्यातील दोघांना अटक करून दोन तासांत त्यांना सोडले गेले. तिचा लॅपटॉप कुठे आहे? हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत आहे. माध्यमांनी याच्या मुळाशी गेले पाहिजे. हे एकच प्रकरण नाही, तर राज्यात कार्यकर्त्याला एक मंत्री बंगल्यात नेवून मारतो; एकाच्या जावयाचे नाव ड्रग्ज प्रकरणात येते, एका युवा मंत्र्याच्या नावाची चर्चा एकाच्या आत्महत्येशी जोडली जाते. त्यानंतरही काही होत नसेल तर याला शिवशाहीचे सरकार कसे म्हणायचे?'' असे पाटील म्हणाले 

राज्य सरकारचे "नाचता येईना, अंगण वाकडे', असे झाल्याची टीका करताना पाटील म्हणाले, "कोरोना संकटात सगळे केंद्राने दिले. राशन दिले, इंजेक्‍शन दिले, औषधे दिली, कीट दिले, राज्य सरकारने काय केले? जीसीएटीच्या नावाने ओरड करण्यासाठी त्याची व्यवस्था समजून घ्यावी, अभ्यास करावा. त्याआधी राज्य शासनाने कर्जमाफीचे काय झाले? शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली का? बांधावर जाऊन हेक्‍टरी 50 हजार रुपये देण्याच्या उद्धव ठाकरे यांच्या घोषणेचे काय झाले? याची उत्तरे द्यावीत.'' 

या वेळी आमदार सुधीर गाडगीळ, गोपीचंद पडळकर, जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे, नीता केळकर, शेखर इनामादार, केदार खाडीलकर आदी उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com