पदवीधर राष्ट्रवादी कॉंग्रेसला दणका देतील : सदाभाऊ खोत  - Graduate voters will hit NCP : Sadabhau Khot | Politics Marathi News - Sarkarnama

पदवीधर राष्ट्रवादी कॉंग्रेसला दणका देतील : सदाभाऊ खोत 

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020

महाविकास आघाडी सरकारने​ आरक्षणापासून शेतकऱ्यांना मदत देण्यापर्यंत गोंधळ घातला आहे.

सांगली : राज्यातील महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले आहे. ना शेतकऱ्यांचे कल्याण होतेय, ना तरुणांचे. आरक्षणापासून शेतकऱ्यांना मदत देण्यापर्यंत गोंधळ घातला आहे. त्याचा परिणाम मतपेटीत जाणवेल. पुणे विभागातील पदवीधर राष्ट्रवादीला दणका देतील, अशी टीका रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली. 

शिराळा आणि वाळवा तालुक्‍यातील विविध गावांमध्ये महायुतीचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांच्या प्रचारासाठी आयोजित बैठकांमध्ये ते बोलत होते. ऐतवडे बुद्रूक, तांदूळवाडी, कासेगाव, ताकारी, आष्टा या ठिकाणी बैठका झाल्या.

भाजप नेते सम्राट महाडिक, जिल्हा परिषदेचे सभापती जगन्नाथ माळी, निजाम मुलाणी, जयराज पाटील, मारुती खोत, जयसिंगराव शिंदे, प्रताप पाटील, विद्या पाटील, केदार नलवडे, योगेश पाटील, अमोल पाटील आदी उपस्थित होते. 

सदाभाऊ खोत म्हणाले, "संग्रामसिंह देशमुख महायुतीच्या माध्यमातून लढत आहेत. आमचे सहकारी पक्ष ताकदीने काम करत आहेत. एकंदरीत राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडीने विविध योजना बंद केल्या. उद्योग, व्यवसायाला चालना दिली नाही. कोरोना काळात राज्य सरकारने मदत न करता वाऱ्यावर सोडले. मराठा आरक्षण टिकवू शकले नाहीत. शैक्षणिक सवलतही रद्द केली. त्याचा संताप मतपेटीतून व्यक्त होणार आहे. तरुणांनी या सरकारला जागा दाखवून देण्याची ही संधी आहे.'' 

ते म्हणाले, "केंद्र सरकारचे काम लक्षवेधी आहे. कोरोना काळात खूप काम केले. मोफत धान्य दिले. प्रत्येक घटकाला मदत केली. फडणवीस सरकारने धनगर समाजासाठी सवलती जाहीर केल्या. मराठा आरक्षणाचा विषय ताकदीने रेटला. मात्र, आताचे सरकार फेल आहे. पदवीधरांनी त्यांना उत्तर द्यावे. संग्राम देशमुख हे प्रभावी जिल्हा परिषद अध्यक्ष राहिले आहेत. मोठा निधी मिळवून आणला. कामे उभी केली. त्यांची क्षमता मोठी आहे. ते चांगले उद्योजक, सज्जन राजकारणी व समाजकारणी आहेत.'' 

शहाजी पाटील, पी. आर. पाटील, विनायक जाधव, रहीमशा फकीर आदी या वेळी उपस्थित होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख