आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल - Filed a case against MLA Gopichand Padalkar | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 1 जुलै 2021

पवार यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केल्यामुळे पडळकर यांच्या गाडीवर सोलापुरातील मड्डी वस्ती परिसरात बुधवारी सायंकाळी दगडफेक झाली.

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) सोलापूर जिल्ह्यात घोंगडी बैठका घेत आहे. सोलापूरातील मड्डी वस्तीत बैठक होती. ती बैठक सायंकाळी साडेसहा वाजता सुरू झाली. कोरोनाचे निर्बंध असतानाही दुपारी ४ नंतर बैठक घेतल्यामुळे पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. (Filed a case against MLA Gopichand Padalkar)    

कोरोनाच्या महामारीमुळे राज्य सरकारने दुपारी 4 नंतर राज्यांमध्ये निर्बंध कडक केले आहेत. या कालावधीमध्ये जमावबंदीचा नियम मोडल्या प्रकरणी आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार पडळकर व 29 समर्थकांवर सोलापुरमध्ये जोडभावी पेठ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय दंड संहिता कलम 1860/188/269 आणि 336 तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 ब नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचा : शरद पवार सरकारवर अंकुश ठेवण्यात कमी पडले: चंद्रकांत पाटील

दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केल्यामुळे पडळकर यांच्या गाडीवर सोलापुरातील मड्डी वस्ती परिसरात बुधवारी (ता. ३० जून) सायंकाळी दगडफेक झाली. यात घटनेत कोणालाही इजा झालेली नाही, असे पडळकर यांनी या घटनेनंतर मीडियाशी बोलताना सांगितले होते.  

गोपीचंद पडळकर यांनी सोलापुरातील पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महाविकास आघाडीतील नेत्यांवर खालच्या पातळीवर टीका केली होती. त्यावरून त्यांच्या भाषेबद्दल नाराजी व्यक्त होत होती.  

ह्या दगडफेकीसंदर्भात बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, मी मंगळवारपासून सोलापूर जिल्ह्यात घोंगडी बैठका घेत आहे. आज सकाळपासून सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात आम्ही घोंगडी बैठका घेत आहोत. दुपारी पत्रकार परिषद झाल्यानंतर आमची मड्डी वस्तीत बैठक होती. ती बैठक काही कारणामुळे सायंकाळी साडेसहा वाजता सुरू झाली. बैठक संपल्यानंतर मी गाडीत बसून थोडे पुढे आल्यानंतर गाडीवर मोठे दगड टाकण्यात आले. त्यानंतर ते सर्वजण पळून गेले आहेत.

हेही वाचा : पुलाच्या उद्घाटनावरुन सत्ताधारी भाजप अन् राष्ट्रवादी आमनेसामने

पवारांच्या नेतृत्वाखाली राज्यात कशा प्रकारे गुंडगिरी चालते, हे राज्याला माहिती आहे. यामध्ये कोणालातरी पुढे केले असेल. माझी येथे कोणीशी ओळख नाही आणि कोणीशी शत्रुत्वसुद्धा नाही. आम्ही लोकशाही मानतो, आम्ही सुसंस्कृत आहोत, अशा वावड्या उठवणाऱ्यांचा चेहरा या प्रकारामुळे पुढे आलेला आहे. माझ्या गाडीवर दगडफेक करून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न असेल तर माझा आवाज असा बंद होणार नाही. उद्या गोळ्या जरी घातल्या तरी मी या विषयात मागे हटणार नाही.

पवारांवरील टीकेचा हा परिणाम आहे का, या प्रश्नावर पडळकर म्हणाले की पवारांचे बगलबच्चे सध्या टेन्शनमध्य आहेत. त्यांचा बुरखा फाटत आहे. मला दररोज शिवीगाळ आणि धमक्याचे मेसेज येत असतात. त्यांनी पन्नास वर्षे असेच राजकारण केले आहे. त्यांच्या पायाखालीची वाळू सरकू लागली आहे. या प्रकरणातही त्यांचे हस्ते परहस्ते फिल्डिंग लावली असणार, असा आरोप पडळकर यांनी केला होता.

Edited By - Amol Jaybhaye  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख