इचलकरंजी : शिवसेना खासदार धैर्यशील माने यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच झाले. या उद्घाटनाला भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
इचलकरंजी शहरातील जुन्या नगरपालिकेच्या जवळ माने यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला माजी खासदार निवेदिता माने, शिवसेनेचे माजी आमदार सुरेश हळवणकर, मदन कारंडे, नगराध्यक्षा अलका स्वामी, अशोक स्वामी, रवींद्र माने, हरिष बोहरा, महादेव गौड उपस्थित होते. इचलकरंजी शहरातील समस्या असतील तर या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन माने यांनी यावेळी केले.
सुरेश हळवणकर यांच्यासह भाजपचे सर्व कार्यकर्ते यावेळी उपस्थित असल्यामुळे जिल्ह्यात दिवसभर या गोष्टीची चर्चा रंगली होती. राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांचं महाविकास आघाडी सरकार सत्ते आहे, तर भाजप विरोधात आहे. मात्र इचलकरंजी शहरामध्ये शिवसेना-भाजप कार्यकर्ते एकत्र आल्यामुळे भविष्यात शहर पातळीवर एकत्र येणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.
कोल्हापूर महापालिका निवडणुकीचं चित्र काय?
कोल्हापुरात महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या होत्या. महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची भूमिका आधी कोणी घेतली, यावरुन काँग्रेस नेते सतेज पाटील आणि शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यात वाकयुद्ध रंगलं होतं.
शिवसेनेने स्वबळाची भाषा आधी केल्याचा दावा सतेज पाटल्यांनी केल्यानंतर महाविकास आघाडीतील दोन पक्षांमध्ये ठिणगी उडाली होती. त्यामुळे भाजप शिवसेनेच्या कार्याकर्त्यांची जवळीक वाढल्याने काही वेगळी समिकरणे होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

