रत्नागिरी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष नावावर मतभेद - Core Committee to Decide Ratnagiri Taluka President | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात उमुख्यमंत्री अजित पवार राजभवनावर दाखल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही थोड्याच वेळात पोचणार

रत्नागिरी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष नावावर मतभेद

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रत्नागिरी तालुकाध्यक्षपदासाठी एकमत न झाल्यामुळे कोअर कमिटीने नाव निश्‍चित करुन जिल्हाध्यक्षांना सुचवावे अशा सूचना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिल्या आहेत. तालुकाध्यक्ष नियुक्‍तीबाबत एकमत न होता कार्यकर्त्यांमध्ये दोन गट पडले आहेत.

रत्नागिरी : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रत्नागिरी तालुकाध्यक्षपदासाठी एकमत न झाल्यामुळे कोअर कमिटीने नाव निश्‍चित करुन जिल्हाध्यक्षांना सुचवावे अशा सूचना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिल्या आहेत. तालुकाध्यक्ष नियुक्‍तीबाबत एकमत न होता कार्यकर्त्यांमध्ये दोन गट पडले आहेत.

नाना मयेकर यांच्या मृत्यूनंतर रत्नागिरीचे तालुकाध्यक्षपद रिक्त झाले. त्याजागी नियुक्‍ती देण्यासंदर्भात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यापुढे शनिवारी झालेल्या बैठकीत चर्चा झाली. अध्यक्षपदासाठी पाच नावे पुढे आली होती. त्यामध्ये जुने-नवे वादाला तोंड फुटले होते. अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ नेते रामभाऊ गराटे, बबलू कोतवडेकर, मिलिंद कीर, बाळकृष्ण लवंदे यांच्यासह राजन सुर्वेचे नाव पुढे होते. रामभाऊ गराटे हे पूर्वी तालुकाअध्यक्ष पदावर कार्यरत होते; परंतु सर्वांना एकजुट करण्यासाठी त्यांना संधी दिली जावी, अशी मागणी काहींनी केली. 

पक्षाने जबाबदारी दिल्यास ती स्वीकारण्यास तयार असल्याचे मिलिंद कीर यांच म्हणणं होते. राजन सुर्वे इच्छुक असल्याची माहितीही काहींनी सांगितली. यावरून बैठकीत एकमत होऊ शकले नाही. यावर तोडगा काढत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कुमार शेट्ये, बशीर मुर्तुझा, सुदेश मयेकर, मिलिंद कीर, बबलू कोतवडेकर, निलेश भोसले यांनी कोअर कमिटी तयार करून याबाबत लवकरात लवकर एकमताने तालुका अध्यक्ष निवडीबाबत एकमत करून अंतिम नाव पुढे करावे असे आदेश दिले आहेत.

पक्षवाढीसाठी बळ द्या
राष्ट्रवादी पक्ष सत्तेत आहे; परंतु रत्नागिरीमध्ये संघटना वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांना बळ दिले जावे अशी मागणी कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्षांकडे केली. एखाद्या गावात पदाधिकारी म्हणून गेलो तर, तेथील विकासकामे करण्यासाठी आम्हाला आश्‍वासने कशी द्यायची हा प्रश्‍न पडतो. फक्‍त संघटना वाढ करा, अशा सूचना केल्या जातात असे कार्यकर्त्यांनी सांगितले.
Edited By - Amit Golwalkar

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख