सांगली : "वंचित बहुजन आघाडीने कॉंग्रेसला हात देण्याचा दोनवेळा प्रयत्न केला. मात्र, त्यांना वंचितांना पुढे येऊ द्यायचे नसावे. या निवडणुकांतील दारुण पराभवानंतर आता कॉंग्रेस हा संपलेला पक्ष आहे. ऐन निवडणुकीच्या काळात या पक्षाचे नेते "हॉलिडे मूड'मध्ये असतात, त्या पक्षाचे कल्याणच आहे,' अशा शब्दांत ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी आज (ता. 24) नाव न घेता राहुल गांधी यांच्यावर टीका केली.
पदवीधर मतदार संघातील प्रचाराच्या निमित्ताने ते सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, "आम्ही कॉंग्रेससोबत जायला कालही तयार होतो आणि आजही आमची तीच भूमिका आहे. लोकसभेला आम्ही राज्यातील 12 जागा मागितल्या होत्या. त्या दिल्या नाहीत. वंचित बहुजनचे लोक विजयी झाले तर सामान्यांची राजकारणात सरसी होईल, अशी भीती त्या प्रस्थापितांना वाटत असावी. ज्या बारा जागा मागितल्या होत्या, तेथील त्यांचे आठ उमेदवार पराभूत झाले आहेत. गेल्या सलग चार निवडणुकांत कॉंग्रेस राज्यात आपटली आहे. आता काय शिल्लक आहे?''
वंचितला सातत्याने भाजपची "बी' टीम म्हटले जाते. त्याविषयी विचारलेल्या प्रश्नावर ऍड. आंबेडकर म्हणाले, "बिहारमध्ये कॉंग्रेसची जी अवस्था झाली आहे, त्यानंतर तेथील आरजेडी पक्षाने कॉंग्रेस हीच भाजपची बी टीम आहे, असा आरोप सुरु केला आहे.''
केंद्र व राज्य सरकार यांच्यात सातत्याने तणावाचे वातावरण आहे. त्याविषयी ते म्हणाले, "केंद्र सरकारने राबवलेली धोरणे राज्य सरकारला सतत डावलता येणार नाहीत. ती मान्य नाही केली, विद्रोह केला तर त्याचे गंभीर परिणाम राज्याला भोगावे लागू शकतात. कलम 350 चा अंमल केंद्राने केला तर आश्चर्य वाटायला नको. आता केंद्राचे धोरण योग्य की अयोग्य, हा नंतरचा भाग.''
मराठा आरक्षणप्रश्नी ते म्हणाले, "मराठा आरक्षणाला अन्य कुणाचाही विरोध नाही, वास्तविक श्रीमंत मराठा हेच गरिब मराठ्यांना आरक्षण मिळू नये, यासाठी प्रयत्न करत आहेत. कारण, खालचा वर्ग वर येऊ नये, हीच त्यांची भूमिका आहे.''
लव जिहादकडे दुर्लक्ष करा
वंचित आघाडीचे नेते, ऍड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की,""लव जिहादच्या नावे कायदे करू देत किंवा आणखी काही भूमिका घेऊ देत, याकडे पुरोगामी संघटनांनी ठरवून दुर्लक्ष करावे.''

