सावंतवाडीच्या भाजप नगराध्यक्षांच्या मोटारीला अपघात  - BJP's Sawantwadi mayor's car had an accident | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

इंदापूरला उजनीतून पाणी देण्याचा निर्णय रद्द : जयंत पाटील यांची घोषणा
मंत्रीमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीसाठी महाविकास आघाडीतील प्रमुख नेते सह्याद्रीवर दाखल. एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि मुख्य सचिव सिताराम कुंटे हेही उपस्थित आहेत.
मराठा आरक्षणासाठीची भाजपची महत्वाची बैठक आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी होत आहे. यासाठी रविंद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, गिरीश बापट, प्रवीण दरेकर उपस्थित आहेत.

 सावंतवाडीच्या भाजप नगराध्यक्षांच्या मोटारीला अपघात 

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 26 मार्च 2021

नगराध्यक्ष संजू परब व त्यांचे सहकारी या अपघातातून बचावले. मात्र....

सावंतवाडी : शासकीय कामकाजासाठी ओरोस येथे जात असताना सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांच्या शासकीय गाडीला पाठीमागून येणाऱ्या मोटारीची धडक बसून अपघात झाला. ही घटना मुंबई-गोवा चौपदरीकरण मार्गावर मळगाव स्वामी धाबा सर्कल येथे शुक्रवारी (ता. 26 मार्च) दुपारी तीनच्या सुमारास घडली. 

नगराध्यक्ष संजू परब व त्यांचे सहकारी या अपघातातून बचावले. मात्र, मागे असलेल्या मोटारीतील कळणे (ता. दोडामार्ग) येथील शिवसेनेच्या संजय गवस यांच्या पायाला दुखापत झाली. या अपघाताची पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. 

हेही वाचा  : भरणेंना ह्या अटींवर दिली निवडणूक आयोगाने सोलापूर दौऱ्यास परवानगी 

नगराध्यक्ष परब व त्यांचे सहकारी काही कामानिमित्त ओरोस येथे जात होते. याचवेळी आपल्या एका खासगी कामासाठी आणि आमदार वैभव नाईक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शिवसेनेचे दोडामार्गमधील मिलिंद नाईक, संजय गवस सहकारी कुडाळ येथे जात होते. परब यांच्या मोटारी मागोमाग त्यांची मोटार होती. 

याचवेळी रस्त्याच्या विरुद्ध दिशेला असलेल्या एका दुकानात जाण्यासाठी संजू परब यांच्या मोटारीतील चालकाने अचानक डिव्हाईडरच्या बाजूला घेतली. यामुळे मागे असलेल्या मोटारीची नगराध्यक्ष परब यांच्या मोटारीला जोरदार धडक बसली. त्यामध्ये पालिकेच्या शासकीय मोटारीचे मोठे नुकसान झाले. मात्र, नगराध्यक्ष परब यांच्या मोटारीतील कोणालाही दुखापत झाली नाही. मागच्या मोटारीत असलेले संजय गवस यांच्या पायाला दुखापत झाली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. 

या घटनेची माहिती मिळताच बीट अंमलदार शरद लवकरे व सहकारी पोलिस घटनास्थळी पोचून पंचनामा केला. या वेळी घटनास्थळी नेमळेचे सरपंच विनोद राऊळ, मळगावचे उपसरपंच हनुमंत पेडणेकर, दीपक जोशी, जितेंद्र गावकर आदींसह भाजपचे कार्यकर्ते आले होते. 

शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी धाव घेत दोडामार्गमधील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची तसेच भाजपचे नगराध्यक्ष परब व त्यांच्या सहकाऱ्यांचीही चौकशी केली. याबाबत येथील पोलिस ठाण्यात अपघाताची फिर्याद मिलिंद नाईक यांनी दिली असून या अपघाताची नोंद पोलिस ठाण्यात झाली आहे, अशी माहिती बीट अंमलदार शरद लोहकरे यांनी दिली. 
 

ओरोस येथे शासकीय कामकाजासाठी जात असताना मोटारीला अपघात झाला. यात चालकाला किरकोळ दुखापत झाली; मात्र जनतेच्या आशीर्वादामुळे सुखरूप बचावलो आहे. 
-संजू परब, नगराध्यक्ष, सावंतवाडी 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख