सांगली जिल्हा परिषदेतही जयंत पाटील भाजपची सत्ता घालवणार?

महापालिकेत महापौर निवडीवेळी नगरसेवक फुटल्याने भाजपमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.
BJP will lose power in sangli Zilla Parishad too
BJP will lose power in sangli Zilla Parishad too

सांगली : महापालिकेत महापौर निवडीवेळी नगरसेवक फुटल्याने भाजपमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सांगली जिल्हा परिषदेतही भाजपला धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. जिल्हा परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती बदलासाठी भाजपमधील मोठा गट आग्रही आहे. त्याचाच फायदा उचलण्याची रणनीती राष्ट्रवादीकडून तयार केली जात असल्याचे संकेत मिळत आहेत. 

सांगली जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आहे. मात्र, भाजपकडे स्पष्ट बहुमत नसून इतरांच्या कुबड्यांचा आधार घेण्यात आला आहे. महापालिकेत धक्का बसल्याने जिल्हा परिषदेत बदल करण्याचा थेट विचारही आता नेते करायला तयार नाहीत. पण येथील एक मोठा गट बदलासाठी आग्रही आहे. बदल न केल्यास अविश्‍वास ठरावाचा प्रयोग केला जाण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे. त्यामुळे महापालिकेनंतर जिल्हा परिषदेत नाट्यमय घडामोडींना वेग आला आहे.

जिल्हा परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती बदलासाठी भाजपमधील 24 पैकी 17 सदस्यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन तशी मागणीही करण्यात आली आहे. परंतू स्पष्ट बहुमत नसल्याने भाजपला धास्ती आहे. मिरज पंचायत समितीत उपसभापती निवडीत भाजपला झटका बसला आहे. कॉंग्रेसने भाजपचे दोन सदस्य फोडले. तर महापालिकेत महापौर निवडीत भाजपचे सात नगरसेवक फुटल्याने मोठा धक्का बसला. आता जिल्हा परिषदेचीही त्यात भर पडल्यास पक्षावर नामुष्की ओढवू शकते. 

भाजप बदलाला अनुकूल नसल्याने अध्यक्षांवर अविश्‍वास ठराव आणण्याचा प्रयत्न नाराज गटाकडून केला जाऊ शकतो. त्यासाठी भाजपमधील फुटीर, कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, घोरपडे गट, रयतचे दोन सदस्य आणि स्वाभिमानी अशी महाआघाडी होऊ शकते.

दरम्यान, जिल्हा परिषदेत अविश्‍वास ठराव आल्यास काँग्रेस साथ देईल, अशी भूमिका काँग्रेसचे पक्षप्रतोद जितेंद्र पाटील यांनी स्पष्ट केले. जिल्हा परिषदेतील कारभार संथ झाला असून त्याला गती देण्याची गरज आहे. त्यासाठी सत्ताबदल व्हायला हवा, असेही त्यांनी सांगितले. 

अविश्वास ठराव आणायचा असल्यास...

जिल्हा परिषदेत अविश्‍वास ठराव आणायचा असल्यास 45 सदस्यांची गरज भासेल. जिल्हा परिषदेत 59 सदस्य असून महिला अध्यक्ष असल्याने दोन तृतियांश बहुमताची आवश्यकता आहे. विरोधकांकडील संख्याबळ पाहता भाजपमधील किमान १५ सदस्य फुटण्याची गरज आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com