शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस सत्तेसाठी फेव्हिकॉल लावल्याप्रमाणे चिकटून बसलेत 

आम्हाला वेडे समजू नका. तुम्ही आतमध्ये काटा मारता.
BJP state president Chandrakant Patil criticizes Shiv Sena, NCP and Congress
BJP state president Chandrakant Patil criticizes Shiv Sena, NCP and Congress

कणकवली : देशातले मूठभर शेतकरीच केंद्राच्या कृषी कायद्याला विरोध करत आहेत. हे मूठभर शेतकरी म्हणजे संपूर्ण देश नव्हे. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी असणारे हे कायदे रद्द होणार नाहीत, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज (ता. 7 जानेवारी) येथील सभेत ठणकावून सांगितले. 

राज्यातल्या आघाडी सरकारवरही त्यांनी टीका केली. शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस सत्तेसाठी एकमेकांना फेव्हिकॉल लावल्याप्रमाणे चिकटून आहेत. हिंमत असेल तर एकेकट्याने लढा, असे आव्हान देखील त्यांनी दिले. 

केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाला समर्थन देण्यासाठी मुडेश्‍वर मैदान ते प्रांत कार्यालय, असा मोठा ट्रॅक्‍टर मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर भाजप कार्यालयासमोरील पटांगणावर सभा झाली. त्यात पाटील बोलत होते. 

खासदार नारायण राणे, भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष डॉ. अनिल बोंडे, आमदार नीतेश राणे, प्रदेश चिटणीस प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष राजन तेली, अतुल काळसेकर यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. 

पाटील म्हणाले, "विरोधकांना आपल्या अस्तित्वाची चिंता आहे. मोदींच्या करिष्म्यापुढे 2024 च्या निवडणुकांत किती जागा निवडून येतील, याचीही खात्री विरोधकांना नाही. आता 55 असणारे पुढे पाच होऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांची ढाल करून विरोधक कृषी विधेयकाला विरोध करत आहेत.'' 

ते म्हणाले, ""कृषी कायद्याच्या मुद्द्यावर जमीन गहाण पडेल, जप्ती येईल, अशा अफवा विरोधक पसरत आहेत. मात्र, कुठल्याही शेतकऱ्याची जागा कुठल्याही कंपनीला घेता येणार नाही, अशी कायद्यात तरतूद आहे. याखेरीज कृषी समिती बाहेर माल विकला, तर शेतकऱ्यांची फसवणूक होईल, असेही विरोधक सांगत आहेत. मी पण शेतकऱ्याचा मुलगा आहे. आमची अडीच एकर शेती आहे. आम्हाला वेडे समजू नका. तुम्ही आतमध्ये काटा मारता. आम्ही बाजार समिती बाहेर बसून माल विकू. आमचा इलेक्‍ट्रॉनिक काटा लावू आणि फसवणूक होऊ देणार नाही.'' 

नारायण राणे म्हणाले, ""गेल्या 70 वर्षांत शेतकऱ्यांच्या भल्यासाठी कॉंग्रेसला जे करता आले नाही, ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करून दाखवले. शेतकऱ्यांना माल कुठेही विकण्याची मुभा कृषी विधेयकात आहे; पण याला विरोध करणाऱ्या राहुल गांधी, उद्धव ठाकरे यांना शेतीमधलं काय कळतंय? 70 वर्षे जुन्या कायद्यांमुळे शेतकऱ्यांची कोंडी होत होती. दलालांच्या माध्यमातून आपला माल विकावा लागत होता. हे 70 वर्षांचे जुने कायदे मोदींनी मोडीत काढले. त्यामुळे कॉंग्रेसची पोटदुखी वाढली आहे. त्यातून ते विरोध करत आहेत.'' 

डॉ. बोंडे म्हणाले, ""मोदींना बदनाम करण्याची खेळी कॉंग्रेस करत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कॉंग्रेस राजकारण करत आहे. जुन्या कायद्यांमुळे शेतकऱ्यांचे भले होणार नाही, म्हणून मोदी यांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांच्या भल्यासाठी नवीन कायदे आणले. कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ ठरल्या होत्या. त्यापासून शेतकऱ्यांची मुक्‍तता व्हावी, शेतकऱ्यांना देशभरात कुठेही माल विकता यावा, यासाठी नवीन कायदे आहेत.'' 


नातेवाईकांना रस्त्याची कामं देण्यात पालकमंत्री मश्‍गुल 

आपल्याच नातेवाईकांना रस्त्याची कामं द्यायची, एवढंच काम पालकमंत्री करतात. आपल्या मर्जीतील ठेकेदारांना काम देऊन त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील चौपदरीकरणाची वाट लावली आहे. तेथील काम रखडल्याचा आरोप खासदार राणे यांनी केला. राज्य सरकार चिपी विमानतळाला वीज, पाणी उपलब्ध करून देत नाहीत. पालकमंत्री लक्ष देत नसल्याने विमानतळाचं काम रेंगाळलं असल्याचेही राणे म्हणाले. 


नीतेश राणे यांनी केले मोर्चाचे नेतृत्व 

ट्रॅक्‍टर मोर्चात 26 ट्रॅक्‍टर, अनेक बैलगाड्या आणि शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. ट्रॅक्‍टरचे स्टेअरिंग हाती घेऊन आमदार नीतेश राणे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. रेल्वे स्थानक परिसरात मोर्चा आल्यानंतर खासदार राणे, बोंडे सहभागी झाले. राज्य राखीव दलाच्या तुकड्यांसह मोठा पोलिस बंदोबस्त शहरात तैनात होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com