अरुण लाड बनले पलूस तालुक्‍यातील पहिले आमदार  - Arun Lad became the first MLA of Palus taluka | Politics Marathi News - Sarkarnama

अरुण लाड बनले पलूस तालुक्‍यातील पहिले आमदार 

संजय गणेशकर 
शुक्रवार, 4 डिसेंबर 2020

तब्बल 35 वर्षांनंतर या भागाला आमदार म्हणून प्रतिनिधित्व मिळाले आहे. 

पलूस : पलूस तालुक्‍याची निर्मिती झाल्यानंतर अरुण लाड यांना तालुक्‍यातील पहिला आमदार होण्याचा मान मिळाला आहे. तब्बल 35 वर्षांनंतर या भागाला आमदार म्हणून प्रतिनिधित्व मिळाले आहे. 

पलूस तालुक्‍याची निर्मिती 1999 मध्ये झाली. अगोदर जी. डी. बापू लाड आणि (स्व.) संपतराव चव्हाण हे या भागचे आमदार झाले आहेत. मात्र, त्यावेळी तासगाव तालुक्‍यामध्ये या सर्व गावांचा समावेश होता. (स्व.) डॉ. जी. डी.बापू लाड यांनी 1957 मध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वतीने निवडणूक लढवली व ते निवडून आले. त्यावेळी अखंड तासगाव मतदार संघ होता. 

बापू हे 1957 ते 1962 अशी पाच वर्षे आमदार होते. त्यानंतर 1978 मध्ये (स्व.) संपतराव चव्हाण हे भिलवडी- वांगी मतदार संघातून या भागातील आमदार म्हणून कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. स्व. चव्हाण हे 1978 आणि 1980 या दोन निवडणुकांत निवडून आले होते. ते 7 वर्षे आमदार राहिले. डॉ. पतंगराव कदम यांनी 1985 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव केला. तेव्हापासून या भागातील आमदार कधीच झाला नाही. 

शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या युतीचे सरकार असताना 1999 मध्ये पलूस तालुक्‍याची निर्मिती झाली. (स्व.) जी. डी. बापू लाड यांजे चिरंजीव व क्रांती उद्योग समूहाचे प्रमुख अरुण लाड यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी पुणे पदवीधर मतदार संघातून उमेदवारी करण्याचे ठरविले. गेली बारा वर्षे ते तयारी करीत होते. 

गेल्या पदवीधर निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने अखेरच्या क्षणी त्यांना उमेदवारी नाकारली. मात्र, त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्यामध्ये त्यांना यश आले नाही. अखेर या वेळी मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसने लाड यांनी संधी दिली. 

सुदैवाने कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना या महाविकास आघाडीची राज्यात राज्यात आली. महाविकास आघाडीचे सर्वच नेते आणि कार्यकर्ते यांनी वज्रमूठ बांधून अरुण लाड यांना निवडून आणले. पलूस तालुक्‍याची निर्मिती झाल्यानंतर या तालुक्‍यातील पहिला आमदार होण्याचा मान अरुण लाड यांना मिळाला आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख