जादा दराने बियाणे विक्री करणाऱ्या कृषी केंद्र चालकास पकडले  - Krishikendra owner caught selling soybeans at higher prices | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी ८.३० वाजता आषाढी पौर्णिमा- धम्म चक्र दिवशी देशवासियांशी संबोधित करतील . मोदी यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.

जादा दराने बियाणे विक्री करणाऱ्या कृषी केंद्र चालकास पकडले 

गजानन काळुसे 
रविवार, 20 जून 2021

सद्या कपाशी, सोयाबीनचे बियाणे, खते यावर किंमती पेक्षा जास्त दराने विक्री सुरू आहे.

बुलडाणा : सिंदखेड राजा तालुक्यामध्ये अंकुर सोयाबीन (Soybean) बियाणांची साठेबाजी करून कृषी केंद्र चालक शेतकऱ्यांना जादा दराने विक्री करत आहे. अगोदर लॉकडाउन व कोरोना संसर्गामुळे शेतकरी आधीच अडचणीत सापडला असतानाच तालुक्यातील कृषी केंद्र चालक खत, बियाणांची जादा दराने विक्री करत आहेत. (Krishikendra owner caught selling soybeans at higher prices) 

जादा दराने खरेदी करावी लागत असल्यामुळे शेतकरी वैतागून गेले आहेत. त्यामुळेच कृषी केंद्र चालकांना प्रशासनाने धडा शिकवण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत होती. तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. कोरोनाच्या महामारीमध्ये सुध्दा शेतकऱ्यांच्या खिशाला कृषी केंद्र चालकाकडून चुना लावण्यत येत असल्याचे पहायला मिळत आहे. सद्या कपाशी, सोयाबीनचे बियाणे, खते यावर किंमती पेक्षा जास्त दराने विक्री सुरू आहे. 

हे ही वाचा : सारथी संस्थेला स्वायत्तता; मराठा समाजासाठी विविध सवलती

शेतकऱ्यांना कच्चे बिल दिल्या जात होते, शेतकऱ्यांना कोणत्याही पर्याय उपलब्ध नसल्यामुळे नाविलाजाने खरेदी करावी लागत आहे.  तालुका कृषी विभागाकडून भरारी पथक तयार करण्यात आले होते. भरारी पथक तालुक्यातील कृषी केंद्र चालकांकडे लक्ष ठेवुन होते. मागील एक दोन दिवसापासून तालुका कृषी अधिकारी व भरारी पथकाकडे तालुक्यातील किनगांव राजा येथील विलास कृषी केंद्र संचालक ज्ञानेश्वर किसन नागरे हे अंकुर सोयाबिन कंपनीचे जे. एस ३३५ या वाणाची जादा दराने विक्री करत असल्याच्या व कच्चे बिल देत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. 

त्यानुसार ता. २० जुन रोजी तालुका कृषी अधिकारी वसंतराव राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकांने सापळा रचुन किनगांव राजा ते सिंदखेड राजा रस्त्यावर असलेल्या कृषी केंद्र चालकांच्या गोडाऊनच्या जवळ उभ्या असलेल्या आयशर क्रमांक एम. एच. १२ एचडी. ४११२ मधुन विक्री केली जात असल्याचे आढळून आले. सदरच्या ठिकाणी उपस्थिती असलेले शेतकरी विठ्ठल दायमा यांच्याकडून पथकाने कच्ची पावती हस्तगत केली. शेतकऱ्यांने ३ बॅग घेतल्या होत्या, कच्च्या बिलावरती प्रतिबॅग ४३०० रुपयांनी विक्री करत असल्याचे आढळून आहे. त्यानंतर पथकाने गाडीची झाडाझडती घेतली. आयशरमध्ये अंकुर सोयाबीनच्या १८ बॅग आढळून आल्या. 

त्यानंतर भरारी पथकाकडून पंचनामा करण्यात आला. सद्या शेतकरीकडून बियाणे पेरणीचे काम सुरू असल्याने भरारी पथकाकडून उपस्थित शेतकऱ्यांना शासकीय दराने व पक्के बिल देऊन अंकुर बियाणाचे वाटप करण्यात आले. कृषी विभागाच्या भरारी पथकामध्ये पंचायत समिती कृषी अधिकारी के. एस. ठोंबरे मंडळ कृषी अधिकारी जी. ए. सावंत, मंडळ कृषी अधिकारी जी. आर. बोरे, कृषी सहाय्यक एस. पी. घुगे, पोलीस कर्मचारी राजु दराडे उपस्थित होते.

कृषी विभाग शहरातील नामवंत कृषी केंद्र चालकांवर कार्यवाही करणार का?

कृषी विभाग शहरातील नामवंत कृषी केंद्र चालकांवर कार्यवाही करणार काय? सिंदखेड राजा शहरामध्ये नामवंत असे कृषी केंद्र आहेत. त्याठिकाणी सुध्दा मोठया प्रमाणात जादा भावाने सोयाबीनांची विक्री होत आहे. तसेच शेतकऱ्यांना कच्चे बिल दिल्या जाते. सद्या पेरणीचे दिवस असल्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव कृषी केंद्र चालकांकडून सोयाबीनचे बियाने खरेदी करावे लागत आहे. त्यांना कृषी चालकांकडून कोणत्याही प्रकारचे फक्के बिल दिले जात नाही. शेतकऱ्यांना पाठबळ नसल्यामुळे तक्रारी करण्यासाठी पुढे येत नाही. तक्रार केली तरी शेतकऱ्यांवर दबाव आणला जातो, किंवा त्याला शासकीय दरात सोयाबीनची विक्री केली जाते, त्यामुळे शहरातील नामवंत कृषी केंद्रावर कार्यवाही करण्यासाठी कृषी विभाग हिम्मत करणार काय? हेच पहावे लागणार आहे.

हे ही वाचा : अजितदादांना पिंपरी-चिंचवडमध्ये चितपट करु: आमदार जगतापांचे खुले आव्हान

सोयाबीनचे बियाणे परराज्यातुन 

तालुक्यामध्ये परराज्यातुन सोयाबीन बियाणे येत असल्यामुळे कृषी केंद्र चालकांकडून ज्यादा भावाने विक्री होत असलेल्याचे बियाणे चांगल्या गुणवत्तेचे आहे का? त्यामध्ये भेसळीची सुद्धा शक्यता आहे. त्यामुळे कृषी विभागाने सद्या विक्री होत असलेल्या बियाणांची गुणवत्ता तपासणी करणे आवश्यक आहे. तालुक्यातील कृषी केंद्र चालकांकडे ज्याठिकाणा वरून सोयाबीनचे बियाणे आले आहेत. त्यांच्याकडे पक्के बिल सुध्दा उपलब्ध नाही. परराज्यातुन सोयाबीन कशी येते यांचा शोध कृषी विभाग घेणार का? परराज्यातुन बियाणे चोरट्या मार्गाने आणले जात असल्याची माहिती कृषी केंद्र चालक खाजगीत सांगत आहे. त्यामुळे कृषी विभागाकडून कडक कार्यवाही करण्याची गरज निर्माण झाली आहे.

तालुक्यातील कृषी केंद्र चालकांना वेळोवेळी सूचना देऊन सुध्दा कृषी केंद्र चालक आताताई करून शेतकऱ्यांचा अंत पाहतात यापुढे कोणत्याही शेतकऱ्यांना अडवणूक होईल, अशा पद्धतीची वर्तणूक अपेक्षित नाही. कायदा हातात घेऊ नये, जादा भावाने विक्री केल्यास परवाना निलंबित करण्यात येईल. सध्या बियाणांची शेतकऱ्यांकडून मागणी असल्यामुळे सदरचे बियाणे वाटप करुन देण्यात आले. सदरच्या कृषी सेवा केंद्रावर प्रशासकीय कार्यवाहीसाठी वरिष्ठांकडे पाठवण्यात आला आहे. कोणत्याही कृषी केंद्र चालकांनी शेतकऱ्यांची अडवणूक करू नये. भरारी पथकाच्या माध्यमातून कृषी केंद्र चालकांवर लक्ष ठेवण्याचे काम केले जात असल्याचे तालुका कृषी अधिकारी वसंत राठोड यांनी सांगितले. 

Edited By - Amol Jaybhaye   

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख