काँग्रेसमध्ये जिल्हाध्यक्षांच्या बदलीचे वारे!

काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकताच महानगरपालिका व जिल्हानिहाय आढावा घेतला.
 Congress district president will also be re-elected .jpg
Congress district president will also be re-elected .jpg

अकोला : काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकताच महानगरपालिका व जिल्हानिहाय आढावा घेतला. त्यातून अनेक जिल्ह्यातील पक्ष नेतृत्व बदलासंदर्भातील विचार पुढे आले आहेत. विशेषतः ज्या जिल्ह्यात सहा वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळापासून एकच अध्यक्ष आहे, तेथे पक्ष नेतृत्वात बदल करून नवे प्रदेशाध्यक्ष जिल्ह्यात नवीन टीम तयार करण्याच्या मनःस्थितीत आहे. त्यात अकोला व वाशीम जिल्ह्याचाही समावेश आहे.  

पटोले यांनी प्रदेश काँग्रेसची धुरा सांभाळल्यानंतर सर्वप्रथम ढेपाळलेल्या पक्ष संघटनेत नवचैतन्य निर्माण करण्यावर भर दिला आहे. त्यासाठी त्यांनी अनेक जिल्ह्यातून पुढे येत असलेली नेतृत्व बदलाची मागणी गांभिर्याने घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यात तीन-तीन वर्षांच्या दोन टर्म किंवा त्यापेक्षा अधिक काळापासून अध्यक्षपदावर असणाऱ्या जिल्हाध्यक्षांना पायउतार व्हावे  लागणार आहे. अकोला जिल्ह्यात हिदायत पटेल यांच्याकडे अनेक वर्षांपासून जिल्हाध्यक्षपद आहे. त्यामुळे त्यांच्या जागीही नवीन जिल्हाध्यक्ष निवडीसंदर्भात लवकरच निर्णय घेतल्या जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

पक्ष संघटनेशी बांधिलकी निवडीचा निकष

जिल्ह्यातील नेतृत्व बदलाची मागणी पुढे आल्यानंतर नवीन जिल्हाध्यक्ष्य कोण, हा साहिजकच विचारला जाणारा प्रश्न प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही अकोल्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांना विचारला होता. त्यावेळी झालेल्या चर्चेतून नवीन जिल्हाध्यक्ष निवडताना पक्ष संघटनेशी बांधिलकी, संघटना बांधणीची क्षमता, जिल्ह्यातील जाती समिकरणांमध्ये फिट बसणारा नेता आदी निकष प्राधान्याने पाळले जाण्याचे संकेत आहेत. वयाची अट नसली तरी पन्नाशीतील पक्षात ॲक्टिव्ह असलेले व प्रत्येक कार्यकर्त्याशी संपर्क असलेल्यांना प्राधान्य दिले जाण्याचेही संकेत त्यांनी दिले आहेत.
 
मराठा कार्ड वापरणार!

काँग्रेसचे जिल्ह्यातील नेतृत्व बदलताना नवीन अध्यक्ष कोण हा सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे. अकोला जिल्ह्यात वंचितकडे अल्पसंख्याकांमधील बरेच गट आहेत. मुस्लिमही वंचितकडे वळले आहेत. बारा बलुतेदारांपैकी अनेक वंचितच्या गोटात आहेत. शिवसेना, भाजपचे जिल्हाध्यक्ष मराठा आहेत. वंचितनेही मराठा नेत्याला प्रदेश उपाध्यक्षपद दिले आहे, तर जिल्हाध्यक्ष पदाबाबतही मराठा नेत्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे काँग्रेसही मराठा जिल्हाध्यक्ष निवडीबाबत आग्रही आहे. काँग्रेसचे विद्यमान युवक अध्यक्ष महेश गणगणे हे माळी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे मराठा कार्डलाच प्राधान्य दिल्या जाण्याची शक्यता अधिक आहे. 
 
यांच्या नावाचा होऊ शकतो विचार!

अशोक अमानकर, प्रशांत गावंडे, डॉ. अभय पाटील ही मंडळी पक्षात नवीन आहे. तरीही मराठा कार्ड चालविताना त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. माळी समाजाचे प्रकाश तायडे यांच्या कुटुंबात लक्ष्मणराव तायडे यांच्या रुपाने १५ ते १६ वर्ष काँग्रेस अध्यक्षपद होते. त्यामुळे पक्ष संघटनेचा अनुभव त्यांच्याकडेही आहे. त्यांच्याही नावाचा विचार होऊ शकतो. मराठा कार्डला प्राधान्य दिलेच तर पक्ष संघटनेशी बांधिल असलेल्या धाबेकर कुटुंबातील सुनील धाबेकर यांचाही विचार होऊ शकतो.

त्यांच्याकडे सध्या कार्याध्यक्षपद आहे. त्यामुळे हाही एक पर्याय खुला. मराठा कार्ड चालविताना कुणबी किंवा देशमुख या घटकातील विचार झाल्यास हेमंत देशमुख, अविनाश देशमुख, पुरुषोत्तम दातकर आदींच्या नावाचा विचार होऊ शकतो. काँग्रेसकडे पर्याय अनेक असले तरी प्रामुख्याने सर्व मान्य होणारा चेहरा नानांच्या पसंतीला पडणार हे निश्चित आहे. 
 
जिल्हाध्यक्ष निवडताना याबाबींचाही होणार विचार!

ज्येष्ठ नेत्यांची मते घेतली जाणार विचारात. राज्यात एकमेव मुस्लिम जिल्हाध्यक्ष अकोल्यात आहे त्यामुळे महानगराध्यक्षपदासाठी मुस्लिम विचार होऊ शकतो. पक्ष संघटनेत कार्याचा अनुभव, संपूर्ण जिल्ह्यात नेतृत्व  बदलासाठी हा निकष असणार आहे. 

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com