solapur municipal commissioner transfer after ajit pawar shows concern amp | Sarkarnama

अजित पवारांनी लक्ष घालताच सोलापूर महापालिका आयुक्तांची बदली

महेश जगताप
शुक्रवार, 29 मे 2020

सोलापूर शहरासोबतच जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर बनली आहे..

पुणे : सोलापूर महापालिकेचे आयुक्त दीपक तावरे यांची आज तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. शहर आणि जिल्ह्यामध्ये कोरोनाने ८५० रुग्णांचा आकडा पार पडल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. त्यांच्या जागी वखार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शिवशंकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तावरे यांना वखार महामंडळात नेमण्यात आले आहे.

शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात कोरोनाने शिरकाव केल्यावर प्रशासन कमी पडत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चर्चा होत होती. त्यातच आज दिवसभर अजित पवार यांनी जिल्हाधिकारी आणि आयुक्त हे जिल्ह्यातील कोरोना रोखण्यास कमी पडत आहेत, असे मत व्यक्त करणारी ऑडिओ क्लिप आज दिवसभर फिरत होती. त्याच पार्श्वभूमीवर आयुक्त यांची बदली केली असल्याचे बोलले जात आहे .

सोलापूरमधून प्रहार संघटनचे अजित कुलकर्णी यांनी अजित पवार यांना जिल्ह्यात दररोज १०० रुग्ण वाढत असल्याने आपण लक्ष द्यावे अशी विनंती केली होती. त्याला उत्तर देताना, `मी वैयक्तिक लक्ष किती देणार? खालचे अधिकारी हे नीट पाहजेत ना, असे म्हणत या ठिकाणी जिल्ह्याचे आयुक्त व जिल्हाधिकारी हे कमी पडत असल्याचे सांगितले. त्याचबरोबर  ही बाब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याही कानावर घातली आहे व मी लक्ष देणार असल्याचे असे आश्वासन  पवार यांनी कुलकर्णी यांना दिले .

गेल्या काही दिवसापासून ग्रीन झोन असणाऱ्या जिल्ह्यात काही दिवसांतच ८५० चा आकडा या जिल्ह्याने पार केला आहे .आत्तापर्यंत शहरी भागापुरता सीमित असणारा कोरोना आता ग्रामीण भागात पसरण्यास सुरवात केली आहे त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.

याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शंभरकर यांचीही उचलबांगडी होणार का असा प्रश्न सोलापूरवासीयांना पडला आहे. कोरोनाच्या परिस्थितीत सर्वात जास्त टीकेला मिलिंद शंभरकर यांना सामोरे जावे लागले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख