कर्जवाटपाचा शंभरकर पॅटर्न :  यंदाच्या खरिपात पाच वर्षांतील सर्वाधिक १६०० कोटींचे वितरण    - Solapur district has the highest loan disbursement of Rs 1600 crore during the kharif season | Politics Marathi News - Sarkarnama

कर्जवाटपाचा शंभरकर पॅटर्न :  यंदाच्या खरिपात पाच वर्षांतील सर्वाधिक १६०० कोटींचे वितरण   

प्रमोद बोडके 
शुक्रवार, 29 जानेवारी 2021

गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका होता, त्यामुळे बॅंकांत शेतकऱ्यांना प्रतिसाद मिळत नव्हता.

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात गेल्या पाच वर्षातील खरिपामध्ये यंदा सर्वाधिक 111 टक्के कर्जवाटप झाले आहे. कोरोना आणि लॉकडाऊन असे दोन प्रमुख अडथळे असतानाही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केलेल्या सूक्ष्म नियोजनामुळे प्रशासनाला हे उद्दिष्ठ साध्य करता आले आहे. बळिराजा अडचणीत असताना त्याला आर्थिक पाठबळ देण्याची किमया यंदाच्या खरिपात जिल्हा प्रशासनाने साध्य करुन दाखविली आहे. 

यंदाच्या खरिपात पीककर्ज वाटपासाठी एक हजार 438 कोटी रुपयांचा लक्ष्यांक देण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र 1 हजार 601 कोटी रुपयांचे कर्ज वाटप झाले आहे. लक्ष्यांकाच्या 111 टक्‍के पीक कर्ज वाटप यंदा जिल्ह्यात झाले आहे. कोरोनाचे संकट 2020 मध्ये मार्चपासून दिवसेंदिवस अधिकच गडद होत गेले. 

कोरोनाला रोखण्यासाठी सरकारने लॉकडाउन जाहीर केला. लॉकडाऊनमुळे शेतमालाचे भाव पडले. खरिपाच्या पेरणीसाठी बळीराजाचा खिसा रिकामा झाला. कोरोना होता; म्हणून बॅंकेत शेतकरी जात नव्हते. गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका होता, त्यामुळे बॅंकांत शेतकऱ्यांना प्रतिसाद मिळत नव्हता. अशा विचित्र स्थितीत सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी खरीप पिक कर्ज वाटपासाठी राबविलेली ऑनलाइन प्रणाली व इतर उपाययोजना प्रभावी ठरल्या आहेत.
 
ऑनलाईन कर्ज मागणी अर्जामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना घरबसल्या पिक कर्जाची मागणी करता येऊ लागली. शेतकऱ्यांच्या कर्ज मागणीची माहिती संबंधित बॅंकेला देण्यात आली. जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बॅंकांच्या विभागीय अधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सातत्याने बैठका घेतल्या. सहकार विभागातील अधिकारी व कर्मचारी, राष्ट्रीयकृत बॅंकांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना पीक कर्ज वाटपासाठी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाण्याच्या सूचना देण्यात आल्या. या सर्वांचा सकारात्मक परिणाम दिसला असून यंदा कोरोनाच्या संकटातही सोलापूर जिल्ह्याने खरिपाच्या पीक कर्ज वाटपाचा उच्चांक गाठला आहे. 

कोरोना आणि लॉकडाऊनचा परिणाम शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली. कर्जवाटपात येणाऱ्या अडथळ्यांवर पर्याय शोधला. खरीप पिक कर्ज वाटपाचे सूक्ष्म नियोजन करुन जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात आले. 
- मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी 

जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या मार्गदर्शनाखाली खरिपात ज्या पद्धतीने उच्चांकी पीक कर्जवाटप केले आहे. त्याच पद्धतीने रब्बी हंगामातही कर्ज वाटपासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत. रब्बी हंगामातही लक्ष्यांकापेक्षा अधिक कर्ज वाटप व्हावे, यासाठी सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. 
- कुंदन भोळे, जिल्हा उपनिबंधक 

 

मागील पाच वर्षातील खरिपाच्या पीक कर्ज वाटपाची स्थिती 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख


वर्ष  लक्ष्यांक वाटप टक्केवारी 
2016-17 1949 1219 62.54 
2017-18   1592 874 54.89
2018-19 1388 1076 77.54 
2019-20 1411 895 63.45 
2020-21 1438 1601 111.31