नवनिर्वाचित आमदाराने पहिल्याच दिवशी त्या कार्यकर्त्याचा घरी जाऊन सत्कार केला  - MLA Samadhan Avtade felicitated the activist who took the vow | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

नवनिर्वाचित आमदाराने पहिल्याच दिवशी त्या कार्यकर्त्याचा घरी जाऊन सत्कार केला 

हुकूम मुलाणी
सोमवार, 3 मे 2021

आमदार समाधान आवताडे यांनी थेट त्याच्या घरी जाऊन त्याच्या पायात चप्पल घालून त्याचा पेहराव देऊन सत्कार केला.

मंगळवेढा : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत समाधान आवताडे विजयी व्हावेत; म्हणून मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील दत्ता साबणे या कार्यकर्त्याने चप्पल घालणे थांबवले होते. जोपर्यंत आवताडे हे आमदार होत नाहीत; तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही, अशी प्रतिज्ञा साबणे यांनी घेतली होती. त्यांच्या या प्रतिज्ञेला यश आले आणि समाधान आवताडे हे आमदार झाले. आपल्यासाठी नवस बोलणाऱ्या कार्यकर्त्याचा नवनिर्वाचित आमदार समाधान आवताडे यांनी थेट त्याच्या घरी जाऊन त्याच्या पायात चप्पल घालून त्याचा पेहराव देऊन सत्कार केला.
        
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर समाधान आवताडे हे निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने चाचपणी करत होते. त्या वेळी नंदेश्वर येथील त्यांचे समर्थक कार्यकर्ते दत्तात्रेय साबणे यांनी ‘जोपर्यंत समाधान आवताडे आमदार म्हणून विजयी होत नाहीत, तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही’ अशी प्रतिज्ञा केली. त्यांच्या या अनोख्या प्रतिज्ञेमुळे या परिसरामध्ये कुतुहलाचा विषय झाला होता.

आमदार प्रशांत परिचारक व दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे या दोन्ही गटाचे मनोमिलन झाल्यामुळे समाधान आवताडे यांचा विजय होण्याचा मार्ग सोपा झाला होता. त्यातूनच 3 हजार 733 मतांनी आवताडे हे विजयी झाले. नवनिर्वाचित आमदार आवताडे यांनी आज नंदेश्वर येथील दत्तात्रेय साबणे यांच्या घरी जाऊन त्यांच्या पायात नवीन चप्पल घालत व त्यांचा सत्कार केला.
 
या वेळी विष्णुपंत आवताडे, सरोज काझी, दादा ओमने, बबलू सुतार, नामदेव जानकर, भारत गरंडे, अशोक चौंडे, आकाश डांगे, अंकुश गरंडे, रुक्मिणी दौलतडे आदी उपस्थित होते.

मंगळवेढ्याचा आमदार व्हावा म्हणून नवस केला

मंगळवेढा तालुक्यातील व्यक्ती पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचा आमदार व्हावा, अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. त्यातच पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत समाधान अवताडे यांना भाजपने उमेदवारी दिली. त्यामुळे कार्यकर्ते त्यांच्या विजयासाठी जिवाचे रान करत असताना आपण यामध्ये काहीतरी योगदान द्यावे. म्हणून जोपर्यंत ते आमदार होत नाही; तोपर्यंत चप्पल न घालण्याची प्रतिज्ञा केली होती. समाधान आवताडे हे आमदार म्हणून विजयी झाले आणि माझी ती प्रतिज्ञा पूर्ण झाली. त्याचे समाधान वाटते, अशी भावना कार्यकर्ते दत्तात्रेय साबणे यांनी व्यक्त केली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख