जयंत पाटील, विश्‍वजित कदम यांनी घातले जतमध्ये लक्ष  - Jayant Patil, Vishwajit Kadam put attention in Jat | Politics Marathi News - Sarkarnama

जयंत पाटील, विश्‍वजित कदम यांनी घातले जतमध्ये लक्ष 

सरकारनामा ब्यूरो 
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांचाही राष्ट्रवादी प्रवेश निश्‍चित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

जत : राज्यात महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुन्हा एकदा पक्ष बांधणीवर जोर दिला आहे. सांगली जिल्ह्यात विशेषतः जत तालुक्‍यावर दोन्ही मंत्र्यांची कृपादृष्टी अधिक राहिली आहे. राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी नुकतेच कारखाना उभारणीचा प्रारंभ केला. दुसरीकडे जयंत पाटील यांनी राजारामबापू साखर कारखाना युनिट 4 यंदा सुरू करून जतच्या राजकारणाला कलाटणी देण्याचे काम केले आहे. 

जत तालुक्‍यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शहरात संपर्क कार्यालय व साखर कारखान्याचा मोळी पूजन सोहळा दसऱ्याच्या मुहूर्तावर करण्यात आला. तालुक्‍यातील दिग्गज व ज्येष्ठ नेते बसवराज पाटील, माजी सभापती प्रकाश जमदाडे, यासह पूर्व भागातील अनेक नेते राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाटेवर विराजमान होताना दिसत आहेत. लागलीच भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांचाही राष्ट्रवादी प्रवेश निश्‍चित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्ष मजबूत करणे व राजकीय व्यूहरचना आखायला सुरूवात केली आहे. राष्ट्रवादी आघाडीतील मित्र पक्ष असला तरी भविष्यात कॉंग्रेसचा प्रतिस्पर्धी पक्ष म्हणून ओळखला जाऊ शकतो. शिवाय जत तालुक्‍यात माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली भाजपला दोन वेळा विधानसभेची लॉटरी लागली. मात्र, जगताप यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेनंतर जत तालुक्‍यात भाजपला नवा चेहरा शोधावा लागणार आहे. 

दरम्यान, कोरोना महामारीच्या संकटामुळे सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंक व सांगली बाजार समितीच्या निवडणुकांना तूर्तास स्थगिती मिळाली आहे. मात्र, निवडणूकीची घोषणा होताच जत तालुक्‍यात राष्ट्रवादी नव्या दमाने उभी राहिली, असे राजकीयदृष्ट्या बोलले जात आहे. 

आमदार विक्रमसिंह सावंत यांनी भाजपचे विद्यमान आमदार विलासराव जगताप यांना पराभूत करून पंधरा वर्षानंतर कॉंग्रेसचा बालेकिल्ला ताब्यात घेतला. नेत्यांची फळी नसताना केवळ जनाधारावर कॉंग्रेसला यश प्राप्त करता आले. शिवाय, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने नेत्यांच्या इनकमिंगबरोबरच पक्षाला जनाधार मिळविण्यासाठी अथक परिश्रम घ्यावे लागणार, हे निश्‍चित. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख