नीतेश राणेंच्या वडिलांना सत्तेत असूनही 15 वर्षांत विमानतळ करता आले नाही  - Despite being in power, Nitesh Rane's father has not been able to build an airport in 15 years | Politics Marathi News - Sarkarnama

नीतेश राणेंच्या वडिलांना सत्तेत असूनही 15 वर्षांत विमानतळ करता आले नाही 

सरकारनामा ब्यूरो 
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची नौटंकी करून ही मंडळी जनतेची दिशाभूल आणि फसवणूक करत आहेत.

कणकवली : गेल्या 21 वर्षात शिवसेना-भाजप, कॉंग्रेस-राष्ट्रवादीची मंडळी सत्तेवर आहेत. पण कोकण विकासाचा एकही प्रश्‍न त्यांना सोडवता आलेला नाही. त्यामुळे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची नौटंकी करून ही मंडळी जनतेची दिशाभूल आणि फसवणूक करत आहेत, अशी टीका मनसे सरचिटणीस आणि माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली. 

दरम्यान, सध्या कणकवलीचे भारतीय जनता पक्षाचे आमदार नीतेश राणे विमानतळाचा प्रश्‍न उपस्थित करत आहेत. मात्र, मागील 15 वर्षे त्यांचे वडील नारायण राणे हे सत्तेत होते, मंत्री होते; पण त्यांनाही हा प्रश्‍न सोडविता आलेला नाही, असा टोमणाही त्यांनी राणे कुटुंबास लगावला. 

माजी आमदार उपरकर यांनी येथील मनसे संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. या वेळी जिल्हा उपाध्यक्ष दया मेस्त्री, तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते. 

उपरकर म्हणाले, रखडलेले विमानतळ, परप्रांतीय ट्रॉलर्स रोखण्यासाठी गस्ती नौका, शेतकऱ्यांना वाजवी नुकसान भरपाई, डॉक्‍टरांची रिक्‍तपदे, खड्‌डेमय रस्ते, शासकीय रुग्णालयांची दुरवस्था आदी प्रश्‍न गेल्या वीस वर्षापासून कायम आहेत. एकाही सत्ताधाऱ्याला हे प्रश्‍न सोडविता आलेले नाहीत. केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोप करून ही मंडळी प्रसिद्धी मिळवत आहेत. 

ते म्हणाले, सध्या मेडिकल कॉलेजवरून शिवसेना श्रेयाचे राजकारण करत आहे. मात्र, याच शिवसेनेला अजूनही कुडाळचे महिला हॉस्पिटल सुरू करता आलेले नाही. 

उपरकर म्हणाले की, गेल्या वर्षीही अतिवृष्टीमुळे भातपिकाची हानी झाली होती. यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अजूनही भरपाई मिळालेली नाही. यंदा हेक्‍टरी दहा हजार म्हणजे प्रतिगुंठा केवळ 100 रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे. त्याचा शेतकऱ्यांना काहीही उपयोग होणार नाही. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी गस्ती नौका आणल्याबद्दल आपला सत्कार करून घेतला होता. मात्र, त्यांच्याच पक्षाचे मालवण शहर प्रमुख गस्ती नौका घ्याव्यात, असे सांगत आहेत. 

माझ्या आमदारकीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी 1 कोटींचा निधी मंजूर झाला होता. मात्र हा निधी देखील तत्कालीन सत्ताधाऱ्यांना खर्च करता आलेला नाही. एकूणच सत्ताधाऱ्यांना विकासाशी काहीही देणेघेणे नाही, तर केवळ आरोप प्रत्यारोप करून राजकारण करायचे आहे, असा आरोप माजी आमदार उपरकर यांनी केला. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख